जावली तालुक्यात शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग:खरीप हंगाम विशेष

:
यांत्रिकी शेतीमुळे जिवाशीवाच्या बैलजोडी सोबतच एकोपा जपणारा वारंगुळा हरपला.
कुडाळ: यावर्षी जावली तालुक्यात वळीवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे तापमानाचा पारा अडतीस अंशा वरून बत्तीस अंशा पर्यंत खाली आला आहे. तसेच पश्चिमेकडून येणारा गार वारा उकाड्याने हैराण झालेल्या जीवांना सुखावत आहे.मान्सून पूर्ण पाऊस झाल्याने शेतकरी वर्ग खरीप हंगामाच्या पेरणी पूर्व मशागती मध्ये व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतातील नांगरणी व फणणीची कामे सुरू आहेत.काळाच्या ओघात यांत्रिकी पद्धतीने शेतीची कामे होत आहेत. बैल जोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे जीवाशीवाच्या बैलजोडी बरोबरच बळीराजा मध्ये एकोपा जोपासणारा वारंगुळा हरपला आहे. त्यासोबतच पहाटेच्या वेळी शेतातून ऐकू येणारे भलरीचे स्वर हरवले असून आता त्याऐवजी ट्रॅक्टरची घरघर ऐकू येत आहे.
रब्बी हंगामाची सुगी उरकत येत असतानाच गावो गावी यात्रांचा सिझन सुरु होतो. यात्रेतील पै पाहुण्याच्या मेजवानी आणि तमाशाच्या माध्यमातून करमणूकित शेतकरी वर्ग काही काळ रमत असतो. शेतीच्या यांत्रिकी करणामुळे शेतकऱ्यांची अंगमेहनत काहीशी कमी झाली आहे.ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट व फणणी करून घेतली जात आहे. असे असले तरीही धरणी माते वरून बळीराजाला मायेचा हात फिरवत शेतातील काडी कचरा वेचून बाजूला करावा लागतो.पिढ्यानं पिढ्या पोसणाऱ्या धरणी मातेची तब्बेत सुधारावी यासाठी शेणखताच्या रूपाने टॉनिक दिले जात आहे.
जावली तालुक्यात खरिप हंगामात डोंगर उतारावरील केळघर, मेढा, करहर, कुसुम्बी, बामणोली विभागात प्रामुख्याने भाताचे पीक मोठया प्रमाणात होते.तसेच कुडाळ, हुमगाव आनेवाडी, सायगाव, तसेच मेढा च्या पूर्व भागात सोयाबीन,भुईमूग, राजमा, घेवडा, चवळी,नाचणी,कडधान्ये आदी पिकेही घेतली जातात.
चौकट: शेतातील कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होत असल्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी झाले आहेत. त्या सोबतच बैलजोडी वर्षभर सांभाळण्याचा खर्च कमी झाला आहे. परंतु दावणीच्या जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत मिळत नसल्याने शेतीची कधीच भरून नं निघणारी मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.भारत हा शेती प्रधान देश आहे. आणि शेती उत्पादनावरच देशाची प्रगती अवलंबून आहे. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे समीकरण होते. परंतु काळाच्या ओघात हे सूत्र बदलले आहे. आणि शेतीला कनिष्ठ दर्जा दिला जात आहे. आज शेतकरी शेती करणाऱ्या मुलाला आपली मुलगी देत नाही. किंवा शेतकऱ्यांची मुलगी शेतकरी नवरा स्वीकारताना दिसत नाही.परंतु महिन्याकाठी लाख रुपये पगार घेणारा हा कोणाचा तरी नोकर असतो. आणि शेती करणारा हा शेतकरी राजा असतो याचा मात्र विसर पडतो.
फोटो:जावली तालुक्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे होत आहेत.(सूर्यकांत जोशी )
