Skip to content

  कुडाळ येथे नवरात्रोत्सवास भक्तीभाव पूर्ण प्रारंभ : कुडाळचे आराध्य दैवत पिंपळेश्वर वाकडेश्वर.

बातमी शेयर करा :-

  सूर्यकांत जोशी कुडाळ – भाविकांचे आढळ श्रद्धास्थान असलेल्या कुडाळ येथील जागृत देवस्थान श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यांच्या  नवरात्रोत्सवास भक्ती भावपूर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला आहे. यानिमित्त मंदिरात आज सकाळी घटस्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त श्रींना आकर्षक पोषाखाने व दागदागिन्यांनी  सजवण्यात आले आहे. देवांचे हे मनोहरे रूप डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांची पहाटेपासून मंदिरात गर्दी होत आहे.

           जावली तालुक्यातील निरंजना अर्थात कुडाळी नदीकाठी वसलेले  कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर हे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात श्री काशी विश्वेश्वराची स्वयंभू पिंडी आहे. त्यांच्या बाजूला मेरूलिंगेश्वर व शंभू महादेव  विराजमान आहेत. तर भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर हे पाषाणात घोड्यावर आरूढ आहेत. शेजारून वाहणारी निरंजना नदी या संपूर्ण भागाची भाग्यलक्ष्मी आहे.ऐन दुष्काळी परिस्थितीत सुद्धा निरंजनामाई सर्वांची तहान भागवण्यासाठी तत्पर असते.

               गावातील जे लोक नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले असतात ते नवरात्रोत्सवात श्रींचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात. श्रींचे नवरात्र करणाऱ्यांना नऊ दिवस तिखट मीठ वर्ज्य असते. केवळ फल आहार घेऊन नऊ दिवस नवरात्र करावे लागते. या कालावधीत नवरात्र करणारा सुचिर्भुत राहून देवाची पूजा अर्चना करत असतो. दररोज देवदर्शन करून  देवांना अकरा प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात आहे. ज्यांना वय अथवा शारीरिक अस्वास्थ्यामुळे नऊ दिवस नवरात्रीचा उपवास करणे शक्य नसते. ते लोक नवरात्रीचा पहिला व शेवटचा दिवस उपास करून आपली श्रद्धा जोपासतात.

            नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अर्थात ललिता पंचमी दिवशी पाचवी माळ असते या दिवशी देवांच्या पंचारतीची मिरवणूक गावातून काढण्यात येते. या पंचारतीच्या माध्यमातून  गावातील विविध मंदिरात आरती केली जाते. या दिवशी  श्रींच्या दसऱ्या दिवशी सिमोलंघन  कोणत्या दिशेला होणार याचा निर्णय होतो. नवरात्रातील अष्टमी दिवशी श्रींची मंदिराभोवती पालखीतून प्रदक्षिणा केली जाते. दसऱ्या दिवशी दुपारी श्रींची सिमोल्लंघणासाठी शाही मिरवणूक निघते. देव सिमोल्लंघण करून आल्यानंतर संपूर्ण गावातून देवांना ओवाळणी केली जाते.  श्रींना पुन्हा मंदिरात जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होते. त्यामुळे हा सिमोल्लंघन सोहळा सुमारे चोवीस तास सुरु असतो. हा डोळ्याची पारणे फेडणारा नयनरम्य  सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असते.

**कुडाळ येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने नवरात्रीत दररोज सकाळी दुर्गादौडचे आयोजन केले जाते. यामध्ये शेकडो शिवभक्त युवक युवती सहभागी होतात**

        यावर्षी नवरात्रौत्सवतील कार्यक्रम पुढील प्रमाणे – सोमवार दि. 7 रोजी पाचवी माळ, शुक्रवार दि. 11 रोजी उपवास सोडणे दुर्गाष्टमी, मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, शनिवार दि. 12 रोजी नवरात्र उद्यापन, घट उठवणे,दुपारी सीमोल्लंघन पालखी सोहळा.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!