Skip to content

जावलीतील अवैध दारू धंद्याबाबत तथाकथित समाजसेवक व पोलिसांची भूमिका संशयास्पद – सौरभ शिंदे

बातमी शेयर करा :-

 सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे उध्वस्त होणारे संसार वाचावेत तसेच भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये या उदात्त हेतूने दारूबंदी चळवळीला सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. आम्ही सुद्धा या चळवळीच्या पाठीमागे ठाम उभे राहिलो. परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षात तालुक्यातील गावोगावी,वाडी वस्ती, गल्लीबोळात अवैध दारू विक्रीचा धंदा बोकाळला आहे . त्यामुळे सरकार मान्य दारू दुकाने बंद करण्याचा हेतू सपशेल फसला आहे. तथाकथित समाजसेवक व पोलीस यंत्रणा अवैध दारू विक्रेत्यांकडून हप्ते वसूल करत असल्याची चर्चा सुरू आहे.तालुक्यात राजरोसपणे होत असणारी बेसुमार अवैध दारू विक्री पाहता. तथाकथित समाजसेवक व पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची शंका प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी  एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे 

            या प्रसिद्धी पत्रकावर  पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र परामणे, संदीप परामणे,पांडुरंग जवळ, भानुदास गायकवाड, नितीन दुदुस्कर, राजेंद्र फरांदे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

             अवैध दारू धंद्यात कमी वेळात, कमी कष्टात सहजपणे अधिक पैसे कमवता येत असल्याने युवा पिढी या धंद्याकडे आकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. अवैध दारू धंदा विरोधात वेळोवेळी अनेक आंदोलने झाली. महिलांनी मोर्चे काढले त्यावेळी  पोलिसांनी तात्पुरत्या थातूरमातूर कारवाया केल्या. परंतु पुन्हा हे धंदे तितक्या जोमाने सुरू झाले. याचा अर्थ पोलिसांचे या व्यवसायांच्यावर कोणतेही नियंत्रण नाही. अवैध व्यवसायिकांच्याकडून पोलिसांना मंथली मिळत असल्याचे आरोप समाजातून होत असताना दिसून येते. त्यामुळे पोलीस जाणीवपूर्वक अवैध व्यवसायिकांना पाठीशी तर घालत नाहीत ना असा सवाल जनतेतून उठत आहे.

               सरकारमान्य दारू दुकानातून होणाऱ्या दारू विक्री पेक्षा 50 पट अवैध  दारू विक्री आज तालुक्यात होत असल्याची चर्चा आहे. सरकार मान्य दारू दुकाने बंद झाली. परंतु दारू पिणाऱ्यांची तोंडे  बंद करण्यास सामाजिक चळवळ व पोलीस यंत्रणा कुछ कामी ठरली हेच आजच्या स्थितीवरून दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात अवैध दारू मिळवण्यासाठी  तालुक्या बाहेर जाण्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेक जण जायबंदी झाले होते . तर आता जादा दराने अवैध दारू खरेदी करावी लागत असल्यामुळे दारू पिण्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांच्या आर्थिक अडचणीत एक प्रकारे भरच पडत आहे.

              आम्ही दारू पिणाऱ्यांचे किंवा अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे समर्थन कधीच करत नाही आणि करणारही नाही. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाणे हे वाईटच. परंतु या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या किती प्रमाणात आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. जे या व्यसनाच्या आहारी जातात त्यांना वेळीच रोखण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी सरकारमान्य दारू दुकाने बंद करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे व त्यांना जादा दराने अवैध दारू घेऊन आर्थिक बर्दंड घालणे योग्य नाही. ज्या उद्देशाने तालुक्यातील सरकार मान्य दारू दुकाने बंद केली तो उद्देश सफल होणार नसेल तर ही दारूबंदी तथाकथित समाजसेवकांना पुरस्कार मिळवण्यासाठी झाली का असा सवाल ही जनतेतून उपस्थित होत आहे. मध्यंतरीच्या काळात सर्वसामान्य जनतेतून झालेल्या मागणीनुसार आम्ही तालुक्यात सरकार मान्य दारू दुकाने उभी करण्याबाबत भूमिका घेतली परंतु अशा समाजसेवकांनी आमच्यावरच बेछूट आरोप केले. सरकारी दारू दुकाने सुरू झाल्यास आपले उत्पन्नाचे मार्ग बंद होतील अशी भीती त्यावेळी अशा तथाकथित  समाजसेवक व पोलिसांना  वाटली असावी अशी शंका व्यक्त होत आहे.

            अवैध दारू विक्रेत्यांनी  जावली तालुक्यातील कुडाळ करहर केळघर म्हसवे आनेवाडी अशा विविध विभाग वाटून घेतल्याची चर्चा आहे. अनेकांनी अनेक ठिकाणी आपल्या शाखा उघडले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री तालुक्यात सुरू असताना पोलीस मात्र गांधारीची भूमिका घेत आहेत. तालुक्यातील अवैध दारू विक्री च्या ज्वलंत प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण लवकरच जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांची भेट घेणार आहोत असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!