सत्ता स्वकर्तृत्वाने मिळवावी लागते- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले.


सूर्यकांत जोशी कुडाळ – महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या कडे सांगण्यासारखे काही नाही त्यामुळे ते वारशाचा व जावली चा स्वाभिमान या शब्दाचा वापर करत आहेत. परंतु सत्तेसाठी जे कधी आपले नाव महाबळेश्वर मधून तर कधी जावलीतून दाखल करतात यातूनच त्यांचा जावलीचा स्वाभिमान दिसून येतो. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी जावलीच्या स्वाभिमानाचे गोंडस नाव घेत आहेत अशी घनाघाती टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अमित कदम यांच्यावर केली. कुडाळ तालुका जावली येथे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांच्या वतीने दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, विशाल वालंजकर विस्तारक सातारा जावली मतदार संघ.श्रीहरी गोळे जावली तालुका अध्यक्ष, जावली पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के, माजी उपसभापती रवींद्र परामणे, हनुमंतराव पार्टे, तानाजीराव शिर्के,एकनाथ रोकडे,ऍड शिवाजीराव मर्ढेकर, हिंदुराव तरडे उपस्थित होते. आजपर्यंत मी कधीही मतांचे राजकारण केले नाही.त्यामुळे मतांचा विचार न करता छोट्या-मोठ्या वाड्या वस्त्यापर्यंत विकास कामे पोचवता आली आहेत. त्याचबरोबर कार्यकर्ता छोटा असो की मोठा असा कोणताही भेदभाव केलेला नाही व करणारही नाही. जे कार्यकर्ते माझे काम करतात माझ्यासाठी वेळ देतात. त्यांच्यासाठी त्यांच्या अडीअडचणी व सुखदुःखाच्या प्रसंगात त्यांच्या पाठीशी कायम उभा राहणार अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कर्तुत्वाचा व कार्यशैलीचे कौतुक केले. सर्व सामान्य कार्यकर्त्याला जपण्याचा आदर्श आमदार शिवेंद्रराजेंकडून घ्यावा. एकेकाळी जावली तालुक्याने शिवसेनेला आमदार दिला तसेच पंचायत समिती वरती भगवा फडकवला आज त्याच शिवसेनेने निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन उरली सोडली शिवसेना संपवली आहे अशी टीका मानकुमरे यांनी केली. प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे म्हणाले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जो अलोट जणसागर जमला होता. त्याचवेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा प्रचंड मताधिक्याने विजय निश्चित झाला आहे. आता फक्त महाराष्ट्रात एक नंबरच्या मताधिक्याने राजेंना निवडून देणे एवढीच जबाबदारी आपल्या सर्वांचे आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सातारा विधानसभा मतदारसंघ विस्तारक विशाल वारंजकर, श्रीहरी गोळे, रवींद्र परामणे, अरुणा शिर्के, ऍड.शिवाजीराव मर्ढेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांनी आभार मानले.