वृक्षहत्या हा मनुष्य वधापेक्षा गंभीर गुन्हा:अभिनेते सयाजी शिंदे, पाचवड ते खेड नियोजित महामार्गात शेकडो झाडांची विनापरवाना कत्तल-संदीप पवार


सूर्यकांत जोशी कुडाळ – माणसाची हत्या केली तर 14 वर्षाचा कारावास होतो परंतु शेकडो वर्षांचे आयुष्य लाभलेल्या झाडाची कत्तल केली तर संबंधिताला जेमतेम काही हजारांचा दंड होतो हे दुर्भाग्य आहे. वृक्षाची कत्तल म्हणजे मनुष्यवधा पेक्षा सुद्धा मोठा गुन्हा आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी केले. सध्या पाचवड ते खेड रत्नागिरी असा कोकणला जोडणाऱ्या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे या दरम्यान शेकडो झाडांची कत्तल होत आहे याबाबत पत्रकारांशी बोलताना सयाजी शिंदे बोलत होते.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी दळणवळणाची सोय उपलब्ध असणे महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागाचा विकास झालाच पाहिजे परंतु विकास करत असताना पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही याचीही तितकीच जबाबदारी घेतली पाहिजे . सध्या पाचवड ते खेड रत्नागिरी दरम्यान नव्याने होऊ घातलेल्या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे यामध्ये पाचवड ते मेढा दरम्यान अनेक वृक्षांची विनापरवाना तोड झाली आहे. याबाबत वनविभागाने संबंधित ठेकेदारावर आज पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. विकास कामाला विरोध नाही परंतु नियमानुसार एक झाड तोडल्यास पाच झाडे लावून जगवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराने घेतली पाहिजे. याबरोबरच ज्या झाडांचे पुनर्रोपण होणे शक्य आहे त्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचा कायदा शासनाने केला पाहिजे असे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले.
पाचवड ते मेढा दरम्यान संबंधित ठेकेदाराने वनविभागाची परवानगी न घेता सुमारे 700 झाडांची कत्तल केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप पवार यांनी केली आहे. यावेळी पवार यांनी वन विभागाला वारंवार सूचना करून सुद्धा सदरच्या वृक्षतोडीकडे वन विभागाने दुर्लक्ष केले तसेच संबंधित ठेकेदाराने विनापरवाना वृक्षतोड केल्यामुळे त्याला नियमानुसार एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावण्याचा नियम लागू होऊ शकणार नाही याकडे लक्ष वेधले.
मेढा ते पाचवड दरम्यान शेकडो झाडांची कत्तल झाले बाबत माहिती मिळताच वृक्ष प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी मेढा ते पाचवड दरम्यान सुरू असणाऱ्या कामाची पाहणी केली यावेळी मोठ मोठ्या झाडांचे कत्तल पाहून मनाला खूप वेदना झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते झाले पाहिजेत विकास झाला पाहिजे हे मान्यच आहे परंतु हे करत असताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून हे काम करण्याची एवढी घाई गडबड कशासाठी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा संकल्प करावा: महेश पवार
जावली तालुका थेट कोकणाशी जोडला जाणाऱ्या पाचवड ते खेड रत्नागिरी दरम्यानच्या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम सुरू असताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अनेक वृक्षांचे कत्तल झाली हे नक्कीच मनाला वेदना देणारे आहे परंतु केवळ शोक व्यक्त करण्यापेक्षा प्रत्येकाने जसे जमेल तसे व जिथे जमेल तिथे किमान एक झाड लावून जगवल्यास झालेली ही पर्यावरणाची हानी भरून निघण्यास मदत होईल. नियमानुसार ठेकेदार एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावेल का आणि ती जगवील का या आशेवर बसण्यापेक्षा पर्यावरण प्रेमींनी स्वतः जबाबदारी घेऊन वृक्ष लागवड करावी अशी प्रतिक्रिया कुडाळच्या पिंपळबन उद्यानाचे संस्थापक महेश पवार यांनी व्यक्त केली.
रस्त्याच्या कामात जाणाऱ्या कुडाळ येथील झाडांचे पुनर्रोपण करणार-पिंपळबन समिती
कुडाळ येथे पिंपळबन प्रकल्प राबवत असताना पिंपळबन समितीच्या माध्यमातून कुडाळ ते मेढा दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वड व पिंपळाची झाडे लावण्यात आली. ही सर्व झाडे आता चांगलीच डौलदार झाली आहेत आणि त्यामुळे या रस्त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.परंतु यातील काही झाडे रस्ता रुंदीकरणात तोडली जाणार आहेत.ही सर्व झाडे पुनर्रोपण करण्याचा संकल्प पिंपळबन समितीच्या वतीने करण्यात आला आहे अशी माहिती वृक्षमित्र अविनाश गोंधळी यांनी दिली.