Skip to content

ऐन सनासुदीत आंदोलनाचा अट्टाहास कशासाठी : जावली तालुक्यातील जनतेतून संतप्त प्रतिक्रिया

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – खरंतर जावली तालुक्यातील जनता शांत आणि संयमी आहे. कुडाळी प्रकल्प तब्बल तीस वर्षे रखडाला तरी सुद्धा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. आता या प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणी आल्या तरी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यावर नक्कीच मात करू शकतात असा विश्वास जावळीतील जनतेत आहे असे असताना. केवळ श्रेय संपादनासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्या पुढे ठेऊन ऐन सणासुदीत आंदोलनाचा अट्टाहास कशासाठी असा सवाल जावळीतील जनतेतून उपस्थित केला जात आहे.

या धरणाची कामे 25 वर्षे रखडली याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे या धरणाच्या शुभारंभापासून ते आज पर्यंत वसंतराव मानकुमरे राजकीय सत्ते सोबत आहेत. असे असताना आज त्यांच्यावर जलसमाधी आंदोलन घेण्याची वेळ येते हे अपयश कोणाचे असाही प्रश्न आज जनतेतून विचारला जात आहे.

नुकत्याच कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशासन आणि ठेकेदारावर आरोप लावले गेले. वास्तविक प्रशासनावर शासनाचा व लोकप्रतिनिधी यांचा अंकुश असतो. शासनाच्या आदेशाचे पालन प्रशासन करत असते मग जिल्हा प्रशासन शासनाच्या आदेश पाळत नाहीत का असा सवाल उपस्थित होतो. आज राज्यात महायुतीचे सरकार असताना यातील प्रमुख पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागते हे शासनाला घरचा आहेरच म्हणावा लागेल.

विलंब झाला तरीसुद्धा श्रेय ज्याचे त्याला मिळणारच

1994 ते 1998 दरम्यान राज्यात शिवसेना भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या वाटेचे पाणी आडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात धरणांची कामे सुरू झाली . त्यावेळी त् सुरुवातीला कुडाळी नदीवर जागोजाग केटी बंधारे बांधण्याचे नियोजन होते परंतु यापूर्वी जावली तालुक्याला कण्हेर व कोयना धरणाच्या माध्यमातून विस्थापित व्हावे लागले आणि या धरणाच्या पाण्याचा कोणताही उपयोग जावली तालुक्याला होत नाही.त्यामुळे जावळी तालुक्यातील पाणी याच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात गेले पाहिजे असा अट्टाहास करून माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी कुडाळी प्रकल्पाचे काम मंजूर करून घेतले. यामध्ये कुडाळी प्रकल्पांतर्गत महू व हातगेघर या लघु प्रकल्पांचाही समावेश होता. दोन्ही धरणे मिळून जमतेम सव्वा टीएमसी पाणीसाठ्याचा हा प्रकल्प होण्यात तत्कालीन आमदार सदाशिव सपकाळ आणि तत्कालीन पंचायत समितीचे सभापती वसंतराव मानकुमरे यांचा नक्की सिंहाचा वाटा होता. आणि या कालावधीत या धरणाचे आणि पुनर्वसनाचे 80 टक्क्याहून अधिक कामे झाली हे सुद्धा जावलीकरांना ज्ञात आहेत.त्यामुळे या धरणाच्या श्रेयाचे मुख्य सूत्रधार माजी आमदार सदाशिव सपकाळ आणि वसंतराव मानकुमरे नक्कीच आहेत. त्यानंतर दहा वर्षे जावली चे नेतृत्व आमदार शशिकांत शिंदे यांनी केले परंतु विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्याच्या आदेशामुळे कृष्णा खोऱ्याची काम ठप्प झाली. असे असताना सुद्धा जिल्ह्यातील उरमोडी तसेच धोमबलकवडी यासारखे मोठी धरणे त्या त्या नेतृत्वाने आपली ताकद वापरून पूर्णत्वास नेहली. आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे जलसंपदा मंत्री पद असून सुद्धा महू व हातगेघर धरणासाठी दहा वर्षात निधी उपलब्ध होऊ शकला नाही. कदाचित दुर्दैवाने शासनाच्या निकषात हे छोटे धरणे बसली नसावीत. परंतु दरम्यानच्या काळात वसंतराव मानकुमरे यांनी अनेक प्रकारचे आंदोलने केली. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत राजकीय भेद दूर करून एकत्र येत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे आणि नुकसान भरपाई चे प्रश्न बऱ्याच प्रमाणात मार्गी लावले.

त्यानंतर जावलीचे लोकप्रतिनिधित्व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आले त्यानंतर गेल्या दहा वर्षात धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न व धरणांची व कालव्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न झाले आज धरणाची व कालव्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यात जात्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीने प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्या प्रमाणात त्यांना त्याचे श्रेय मिळणार. या धरणांचे पाणी जर येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचणार असेल तर या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेहल्याचे श्रेय नक्कीच नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मिळणार आहे.

मानकुमरे यांच्या संघर्षमय नेतृत्वाच्या वाट्याला फुलं आणि काटे

जो नेतृत्व करतो त्याच्यावर काही चांगले वाईट आरोप होतातच वसंतराव मानकुमरे यांनी जरी धरणग्रस्तांच्या साठी संघर्ष केला असला. धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलने केली संघर्ष केला अनेक प्रश्न मार्गी लावले असले तरी सुद्धा सर्वच धरणग्रस्त त्यांच्याविषयी समाधानी आहेत. असे नाही अनेकांच्या मनात काही ना काही सल असल्याचे बोलून दाखवले जाते.मानकुमरे यांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्याचेही काही जण खाजगीत बोलतात.

निवडणुका आणि महू हातगेघर धरण आंदोलन

गेल्या 30 वर्षात निवडणुका आणि धरण आंदोलन यांचा जवळचा संबंध आहे. निवडणुकीत धरणाच्या बाधित क्षेत्रात धरणग्रस्तांच्या प्रश्नाचा विषय तर लाभक्षेत्रात धरणाचे पाणी येण्याचं स्वप्न दाखवून राजकारणी जनतेच्या भावनेवर आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम केले. वास्तविक महू व हातगेघर धरण आणि प्रतापगड सहकारी साखर कारखाना उभारणी हे दोन्ही प्रकल्प जावली तालुक्याला वरदान ठरणारे आहेत. जनतेला प्रगतीच्या दृष्टीने नेणारे दोन्ही प्रकल्प एकाच वेळी पूर्ण होणे अपेक्षित होते. माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांचे इच्छाशक्ती आणि कारखान्याचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र शिंदे यांची जिद्द यांच्या जोरावर प्रतापगड सहकारी साखर कारखाना नियोजित वेळेत पूर्ण झाला परंतु महू व हातगेघर धरणाचे काम मात्र रखडले गेले. त्यावेळी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये असणारा राजकीय भेद यामुळे कारखान्याला उसाचे क्षेत्र उपलब्ध होऊ नये यासाठी या धरण प्रकल्पांची कामे रखडल्याच्या टीका सुद्धा झाल्या होत्या.

निवडणुका आणि भावनिक प्रश्न हा राजकारणाचा पाया

कोणतेही निवडणूक जवळ आली की जनतेच्या भावनिक प्रश्नांना हात घातला जातो एवढे वर्ष कुडाळ विभागाला महू हातगेघर धरणाच्या पाण्याचे स्वप्न दाखवले गेले. तीस वर्षानंतर या धरणाचे काम आज पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावरती आहे.तर मेढा विभागाला वरदान ठरणाऱ्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून लोंबकळत पडला आहे. अजूनही हे धरण लोकांच्या मनात आणि शासनाकडे कागदावर आहे. यात धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होऊन पूर्ण होण्यास अजून किती कालावधी लागेल याचे उत्तर मात्र आज कोणाकडेच नाही. जावली तालुक्याची जनतेच्या मनात नामदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या विषयी असणारा प्रेम व विश्वास पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण असताना विरोधकांना मात देण्यासाठी जर सत्ताधारीच रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतील तर हे सत्ताधाऱ्यांचे यश म्हणावे की अपयश असाही प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होते . एकूणच काय या माध्यमातून निवडणुका जवळ आले आहेत हे मात्र जनतेला लक्षात येत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!