जावली तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा ३५१/१२

जावली तालुक्यात आज दोन जण कोरोना बाधित. मेढा पोलिस ठाण्यातील संबंधित पोलिसांचा अहवाल निगेटिव्ह.
एकूण – ३५१, बळी १२, मुक्त १९१, अँक्टिव्ह – १४८
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील ४७ जणांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते. पैकी दुदुस्करवाडी येथील दोन जणांचा अहवाल कोरोना बाधित आला असून उर्वरीत सर्व निगेटिव्ह असल्याची माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.एकूण ४७ जणांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते.दरम्यान मेढा पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कोरोना बाधित झाली होती. त्यांच्या संपर्कात असलेल्या नऊ पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वाब तपासणी साठी पाठवण्यात आले होते. सुदैवाने या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मेढा पोलीस ठाण्यासह प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे .
प्रशासनाची पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी तयारी सुरू
कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड १९ सेंटर सुरु होणार असल्याची आज जनतेत जोरदार चर्चा सुरू होती. याबाबत अधिक माहिती घेतली असता सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. शासनाची बहुतांश कोरोना सेंटर हाऊसफुल्ल झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यात आवश्यकता भासल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्थानिक कोरोना रुग्णांवर उपचार करता यावेत अथवा संशयित रुग्णांना संस्थात्मक कोरंटाईन करता यावे यासाठी पूर्व तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.
याबाबत जावली तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते म्हणाले, कोरोना संसर्ग ही राष्ट्रीय आपत्ती आहे. अशा परिस्थितीत शासनाला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार करावा लागतो.भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास जर गरज भासली तर पर्याय म्हणून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक बाब म्हणून एक वाँर्ड तैनात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे लोकांनी कोणताही गैरसमज ठेवू नये. तसेच या आरोग्य केंद्रात बाहेरील कोरोना बाधित आणण्याचा कोणताही विचार नाही. असे सांगितले आहे.
जावलीतील दुदुस्करवाडीला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील दुदुस्करवाडी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार दुदुस्करवाडी या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.