
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात बामणोली तर्फ कुडाळ येथील हुतात्मा स्मारकात ऑगस्ट क्रांती दिन हुतात्म्यांना अभिवादन करून ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला तहसीलदार अश्विन मुदगल गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील मंडलाधिकारी श्रीमती आर बी कोळी,बामणोली गावचे सरपंच रेखा तरडे उप सरपंच पवन तरडे, माजी सरपंच बाळासाहेब तरडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन गोगावले शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप तरडे, लालसिंगराव शिंदे पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ तरडे तसेच हुमगाव येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व विद्यार्थी तसेच बामनोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी तहसीलदार अश्विन मुदगल यांच्या हस्ते कृतात्म्यांच्या स्मृतीस्तंभाचे पूजन करून पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्याना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झेंडावंदन करण्यात आले. यावेळी बामणोली ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
जावली तालुक्यात बामणोली तर्फ कुडाळ येथे हुतात्मा स्मारक आहे.येथील स्वातंत्र्य सैनिक सर्जेराव जाधव यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करले त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ए आर अंतुले असताना हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. त्या वेळेपासून या हुतात्मा स्मारकात ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी दरवर्षी तालुक्यातील लोकप्रतिनिधी,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी उपस्थित असतात.परंतु यावर्षी या राष्ट्रीय कार्यक्रमाला चक्क पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.