सूर्यकांत जोशी कुडाळ :
कुडाळ (जि. सातारा):
जावली तालुक्यातील कुडाळ येथील भिसे कॉलनी परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र खळबळ उडवून दिली होती. रस्त्यावर खेळणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचे पिकअप व्हॅनमधून अपहरण झाल्याची माहिती समोर आल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलीस तपासात या संपूर्ण प्रकरणामागील वेगळेच वास्तव समोर आले आहे.
सुरुवातीला काय घडला होता प्रकार?
सोमवारी सायंकाळच्या सुमारास कुडाळ येथील भिसे कॉलनी परिसरात ५, १० आणि १२ वर्षे वयाच्या तीन मुली रस्त्यावर खेळत होत्या. त्यावेळी आलेल्या एका पिकअप व्हॅन मधील तोंडाला मास्क लावलेल्या चौघांनी या मुलींना जबरदस्तीने गाडीत टाकून पुणे-बेंगलोर महामार्गाच्या दिशेने पळवून नेल्याची माहिती समोर आली होती.
मुलींनी सांगितलेल्या माहितीनुसार, उडतारे आणि आनेवाडी दरम्यान पिकअप गाडी एका टपरी जवळ थांबली असता, संधी साधून तिन्ही मुलींनी गाडीतून उड्या मारून पळ काढला. त्यानंतर आनेवाडी टोलनाक्याजवळील एका हॉटेलमधून मोबाईलवरून पालकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. या माहितीनंतर नातेवाईकांनी तात्काळ मेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती.
पोलीस तपासात मोठा ‘ट्विस्ट’
घटनेचे गांभीर्य ओळखून मेढा पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवली. मुलींची सखोल विचारपूस आणि परिसरातील परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला.
पोलीस तपासादरम्यान निष्पन्न झाले की, अपहरणाची कोणतीही घटना घडलेली नव्हती. घरातील लोक रागावतील किंवा रागवतील या भीतीने मुलींनीच अपहरणाचा हा बनाव रचला होता. मुली सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने पालक आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासोबतच, मुलांच्या मनात घरातील मोठ्यांची अवास्तव भीती राहणार नाही आणि ते मोकळेपणाने संवाद साधू शकतील, याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होते.