कुडाळचे पिंपळबन अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर

कुडाळच्या पिंपळबनला सुहासगिरी व विलासबाबा जवळ दाम्पत्यांची भेट
कुडाळ – अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कुडाळ येथील पिंपळबन आणि बालोद्यानला जावली पंचायत समितीच्या सभापती जयश्री गिरी, माजी सभापती सुहास गिरी, महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त युवक संघाचे कार्याध्यक्ष विलासबाबा जवळ, जवळवाडीच्या सरपंच सौ.वर्षाताई जवळ यांनी नुकतीच भेट दिली. लोकसहभागातून होत असलेल्या याप्रकल्पाची यावेळी त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
कोणताही शासकीय फंड नाही की कोणी एक नेता नाही.सामाजिक बांधिलकी समजून याठिकाणी प्रत्येकजण योगदान देत आहे. पिंपळबन व बालोद्यान उभारण्याची कुडाळच्या निसर्ग प्रेमींची जिद्द व चिकाटी वाखानन्या सारखीच आहे. असे सुहासगिरी म्हणाले, यावेळी त्यांनी पिंपळबनात सुरु असलेल्या संरक्षणभिंतीच्याबांधकामासाठी एकलाख रुपयांची मदत जाहीर केली.तसेच याकामासाठी यापुढेही मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी विलासबाबा जवळ यांनी सुद्धा या प्रकल्पाला शुभेच्छा देऊन आपल्या कुटुंबियांच्या वतीने पिंपळबन च्या कामासाठी आर्थिक मदत दिली.
पिंपळबनात लावलेल्या रोपट्यांना जसजसा बहर येत आहे. तसतसा या उपक्रमाबाबत लोकांच्या मनात ही जिव्हाळा व प्रेम वाढत आहे. पिंपळबनला भेट देण्यासाठी व या उपक्रमाबाबत उत्सुकतेने माहिती घेण्यासाठी अनेक गावचे निसर्ग प्रेमी येत आहेत. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपळबन ला अनेकजण सहकुटुंब भेट देत आहेत. अवघ्या वर्षभरात पिंपळबन प्रकल्प लोकप्रिय झाला आहे.