कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हापरिषदेची भरारी पथके तैनात – सतीश बुद्धे

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हापरिषदेची भरारी पथके तैनात – सतीश बुद्धे
सूर्यकांत जोशी कुडाळ – ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे.तरीसुद्धा लोक बेशिस्त वागत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने गण निहाय भरारी पथके तयार केली आहेत. जावली तालुक्यात सहा भरारी पथके तैनात करण्यात आली असून यापुढे नियम न पाळणारांवर जिल्हाधिकारी सातारा यांचे आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिला आहे.
गेले चार महिने शासन, प्रशासन, पोलीस, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध प्रसार माध्यमातून लोकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. परंतु अनेक जण बेफिकीर पणे वागत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा लाँकडाऊन करावे लागल्यास त्याचा परिणाम नियम पाळणारांना नाहक भोगावा लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून बेशिस्त लोकांना कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी केली जात आहे.
यापुढे मास्क न लावल्यास रुपये ५००, सोशल डिस्टेन्सींग न पाळल्यास संबंधित दुकानदार व संस्थांना रुपये एकहजार दंड भरावा लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाराना सुद्धा एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. पंचायत समिती गण निहाय भरारी पथके अचानक भेटी देऊन ही दंडात्मक कारवाई करणार आहे. दुसर्यावेळी संबंधिताने तीच चूक केल्यास दुप्पट दंड व संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात येणार आहे.