महू धरणातील पाणी लाभ क्षेत्रातील तलावात सोडा :पाण्या अभावी जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ सौ. अरुणा शिर्के


कोरडा ठणठणीत पडलेला सरताळे येथील पाझर तलाव
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील डोंगर उतारावरील गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. महू व हातगेघर धरणातील पाण्याच्या माध्यमातून या लाभ क्षेत्रातील छोटे मोठे पाझर तलाव भरल्यास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन या विभागातील पाझर तलावात या धरणांचे पाणी सोडावे अशी मागणी जावली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अरुणा शिर्के यांनी केली आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले यांनी नेहमीच जनतेच्या हितासाठी सदैव प्रयत्न केले आहेत. त्यांच्या माध्यमातून म्हसवे जिल्हा परिषद गटात मोठया प्रमाणात विकास कामे झाली आहेत. या धरणाचे पाणी माण तालुक्यात नेहण्याचा प्रशासनाचा डाव अत्यंत जागरूक पणे आ. बाबाराजेंनी हाणून पाडला होता.या विभागातील पाणी प्रश्ना बाबत सुद्धा आम्ही त्यांना सांगितले आहे.आगामी तीन महिन्यात उन्हाळा मोठया प्रमाणात जाणवणार असून पाणी टंचाईची समस्या अधिक जाणवणार आहे.त्यामुळे याबाबत आवश्यक सर्व उपाय योजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. असेही शिर्के यांनी सांगितले.
आज महू व हातगेघर ही पाण्याने भरलेली धरणे उशाला असूनही या विभागातील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे.या धरणाच्या कालव्याच्या पाईपलाईंनचे काम बहुतांश पूर्ण होत आले आहे. या धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या डोंगर उतारावरील गावांना सध्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. नद्या इत्यादी पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटले आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने कुपनलिकांनाही पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही.त्यामुळे या विभागातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
महू धरनाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यास त्याचा लाभ वालुथ ,रामवाडी,जरेवाडी, हूमगाव,सोमर्डी ,बामणोली,म्हसवे,आखाडे, म्हसवे, सरताळे इत्यादी गावांना तसेच उजव्या कालव्याच्या माध्यमातून इंदवली,करंदी,रांनगेघर, दरे,आलेवाडी ते आनेवाडी, सायगाव,रायगाव इत्यादी गावांना पाणी उपलब्ध होणार आहे. या गावांच्या जवळचे पाझर तलाव भरल्यास जवळपासच्या विहिरी व कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे माणसांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.असे सौ अरुणा शिर्के यांनी स्पष्ट केले.