आनेवाडी टोल नाक्यावर स्थानिकांना फसवून टोल वसुली : MH 11वाहनांना टोल माफी बाबत लोकप्रतिनिधीनी लक्ष घालण्याची मागणी

कुडाळ – महामार्गावरील सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यावर वाई व जावली तालुक्यातील स्थानिक वाहने आर सी बुक दाखवल्यावर सोडली जातात. परंतु नंतर टोल वसुल केल्याचा मेसेज वाहन धारकांना येतो. अशा प्रकारे वाहन धारकांना फसवून टोल वसुली केली जात आहे.त्यामुळे वाहन धारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विशेषतः टोल बूथवरील महिला कर्मचारी जाणीव पूर्वक स्थानिक वाहनांचा टोल घेत आहेत.याबाबत लोकप्रतिनिधिनी संबंधितांना समज द्यावी अशी मागणी केली जात आहे.
वाई व जावली तालुक्यातील लोकांना सातारा येथे जायचे झाल्यास जेमतेम दहा किमी महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यासाठी 80 रुपयांच्या टोलचा बुर्दंड सोसावा लागतो. दररोज प्रवास करणाऱ्या वाहनांना मासिक पास परवडू शकतो परंतु महिन्यातून एखाद दुसऱ्यावेळी जाणाऱ्या वाहन चालकांना पास आर्थिक दृष्ट्या परवडत नाही.खेड शिवापूर टोल नाक्यावर लोकप्रतिनिधि्यांच्या सुचनेने MH 12 वाहनांना टोल नाक्यावरून मोफत सोडले जाते. मग आनेवाडी टोल नाक्या बाबत येथील लोक प्रतिनिधी असा निर्णय घेत नसल्याने वाहन धारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
टोल नाका चालविण्याचा ठेका कोणाला द्यायचा यावरून लोकप्रतिनिधीमध्ये श्रेय वाद होत असल्याचे सर्वश्रुत आहे. सध्या आनेवाडी टोलनाका चालवण्याचा ठेका खासदारांच्या मर्जितील ठेकेदाराकडे असल्याची वाहनधारकां मध्ये चर्चा आहे.त्यामुळे या निवडणुकीत वाहन धारकांच्या नाराजीचा फटका मतदानातून स्थानिक खासदारांना बसण्याची शक्यता असल्याची चर्चा वाहन धारकांकडून व्यक्त होत आहे.