
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोकांना लाभ देणार.
सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्र राज्य बांधकाम फेडरेशन च्या माध्यमातून सभासद कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या संजीवनी प्रमाणे आहेत. भारतीय जनतापक्षाच्या माध्यमातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन व सातारा श्रमिक कामगार संघटना यांच्या वतीने आयोजित बांधकाम कामगार भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के, कुडाळ सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे, संचालक अमोल शिंदे, संघटनेचे राज्य उपअध्यक्ष धनराज कांबळे,जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे उपस्थित होते.
धनराज कांबळे म्हणाले, बांधकाम कामगारांना फसवले जाऊ नये, त्यांच्या अडिअडचणी समजावून घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. असंघटित कामगारांना संघटित करून महामंडळाच्या योजनेचा लाभ पोहचवण्याचे कार्य होत आहे. महामंडळाचे तीस हजार कोटी शिल्लक आहेत. या रकमेच्या व्याजातून बांधकाम कामगारांना लाभ देण्यात येत आहे.बाळंतपण,मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न,घरकुल, आजारपण, अपघात, मृत्यू यासारख्या अनेक अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट घटनांच्या मदतीसाठी बांधकाम कामगारांना महामंडळाच्या विविध प्रकारच्या बत्तीस योजना आहेत. याचा लाभ घेता आला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हसवेचे माजी सरपंच अजय शिर्के यांनी केले. यावेळी माजी सभापती अरुणा शिर्के, जयदीप शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. रणजीत शिंदे यांनी आभार मानले.