महु हातगेघर धरणग्रस्त व लाभ धारक कृती समितीचा ऐन गणेशोत्सवात आंदोलनाचा निर्णय : ठोस आश्वासन न मिळाल्यास गणेश विसर्जनासोबतच जलसमाधीचा इशारा.


सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ विभागाला वरदान ठरणाऱ्या कृष्णा खोरे महामंडळाच्या माध्यमातून होऊ घातलेल्या कुडाळी प्रकल्पातील महू व हातगेघर धरणाचे काम गेल्या 30 वर्षापासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नाने या प्रकल्पाचे व कालव्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.परंतु उर्वरित दोन पाच टक्के कामाबाबत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक वेळ काढून पणा करण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करून धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात लवकरात लवकर पोहोचण्यासाठी प्रशासनाने अंतिम तारीख जाहीर करावी यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिला आहे. जावली तालुक्यात ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन होत असल्याने याची तातडीने दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या कोणत्याही परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही मानकुमरे यांनी यावेळी कुडाळ येथेआयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी समितीचे उपाध्यक्ष व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, सचिव व जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे जावली तालुका भाजपा अध्यक्ष संदीप परमणे माजी उपसभापती तानाजी शिर्के सोसायटीचे चेअरमन मालोजीराव शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
महू व हातगेघर धरणाच्या लाभक्षेत्रातील 41 गावातील शेतकरी सहभागी होणार आहेत. दिनांक 27 ऑगस्ट पासुन सुरु होणारे आंदोलनात प्रत्येक गावातुन कोपरा सभा , महिला व पुरुष ,मुलेबाळे यांचेकडुन जनजागरण महिला मंडळाच्या वतीने भररस्त्यावर झिम्मा फुगड्यांचे माध्यमातून रास्ता रोको करुन प्रशासनाला इशारा देणारे आंदोलन सुरु करण्यात येईल.बुधवार दिनांक 03 सप्टेबंर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता करहर विठ्ठल रुक्मिनी मंदिर परिसरात धरणग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकरी यांचे साखळी उपोषण सुरु होईल.दुपारी 1.00 वाजता दरे बु. पंचक्रोशीतील सर्व गावे यांचा रास्ता रोको व महिला , पुरुष व मुले यांचा शेतीला पाणी मिळावे यासाठी रास्ता रोको व आक्रोश आंदोलन करतील.दुपारी 4.00 वाजता कुडाळ भव्य दिव्य आंदोलन व शासनाच्या,प्रशासनाच्या विरोधात जाहिर निषेध सभा होईल.गुरुवार दिनांक 04 सप्टेंबर 2025 सायगाव येथे सकाळी 11.00 वाजता जनजागृती रास्ता रोको व ठिय्या आंदोलन होईल.दुपारी 4.00 वाजता करहर महिला व पुरुषांचा जन आक्रोष आंदोलन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार 6 सप्टेंबर 2025 रोजी गावोगावचे गणपती विसर्जनावेळी महु हातगेघर धरणामध्ये तसेच या धरण क्षेत्रात येणाऱ्या 41 गावातील लाभधारक शेतकरी तलाव, नद्या या मध्ये उड्या मारुन जलसमाधी घेतील.
कुडाळ विभागाला संजीवनी ठरणारे महु – हातगेघर धरण 100 टक्के पुर्ण झाले आहे. तसचे धरणाच्या दोन्ही बाजुंनी पाणी वितरीकांचे काम जवळजवळ पुर्णत्वास येऊन 41 लाभ क्षेत्रातील 41 गावांतील शिवारात पाणी पोहोचणार असुन संपुर्ण कुडाळ विभाग सुजलाम सुफलाम होणार आहे. परंतु गेली अनेक वर्षे किरकोळ समस्यांमुळे या विभागातील शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी असुनही आजतागायत शेतात कॅनॉलचे पाणी पोहोचलेले नाही.त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या विभागातील शेतकऱ्यांची झालेली आहे. तसेच महु- हातगेघर धरणाच्या प्रकल्पबाधीत धरणग्रस्तांची अगदी किरकोळ कामे शासन दरबारी प्रलंबीत आहते. या धरणग्रस्तांना पाणी अडविल्यामुळे शेतीचा , घरामध्ये राहण्याचा जटील प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने त्यांच्या या प्रश्नाकडे गेली 25 वर्षे लक्ष न दिल्यामुळे या धरणग्रस्तांना जीव मुठीत घेऊन जीवन जगावे लागत आहे. धरणग्रस्तांचे प्रश्नांची शासन दरबारी त्वरीत सोडवणुक न झालेमुळे धरणग्रस्तांवर व लाभक्षेत्रातील जनतेवर अन्याय होत आहे. तरी या पार्श्वभुमीवर महु – हातगेघर धरणाचे लाभक्षेत्रातील 41 गावांचे शेतकरी व प्रकल्प बाधीत धरणग्रस्त शेतकरी यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मा.ना.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले , मंत्री सार्वजनिक बांधकाम , महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी, मा.जिल्हाधिकारी सो, सातारा , मा.पोलिस अधिक्षक सो, सातारा व इतर मसुल विभाग व जलसंपदा विभाग यांना आणुन या भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा निपटारा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.