जावली तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत सावंतवाडी व सोनगाव येथील तब्बल दहा घरे फोडली –




सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सावंतवाडी येथील पाच तर सोनगाव येथील चार बंद घरे फोडली. यामध्ये चोरट्यांच्या हाताला फारसा मुद्देमाल लागला नाही. परंतु घरमालक आणि पोलिसांच्या डोक्याला मात्र नक्कीच जादा त्रास भोगावा लागला.
सावंतवाडी तर्फ कुडाळ येथील जगन्नाथ गंगाराम सावंत, अनिल संपत सावंत, धनाजी गंगाराम सावंत, शंकर गंगाराम सावंत यांच्या घराच्या कुलूप व कोयंडे तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला व घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले.
सोनगाव तालुका जावली येथील धर्मेंद्र दादू जाधव, विनोद दिनकर भोईटे, संदीप संजय जाधव, प्रकाश अंकुश भोसले, हे काही कामानिमित्त बाहेरगावी होते. चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कोयंडे तोडून घरातील कपाटे व बॅगा उचकटून साहित्य अस्ताव्यस्त केले. या चोरीच्या घटनेत फार मोठे किमतीऐवज छोट्यांच्या हाती लागले नसल्याचे प्राथमिक समजते. त्याचबरोबर दत्तात्रय मेंगळे यांची मोटार सायकल चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्याने केला. चोरट्याने बंद घराची चोरी करण्यापूर्वी शेजारच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या असे शेजारच्या नागरिकांनी सांगितले. सदर घटनेची माहिती संबंधित घरमालकांना कळवल्यानंतर संबंधितांना उद्योग धंदा सोडून गावी यावे लागले. दरम्यान घटनास्थळी मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान चोरीच्या वाढत्या घटना पाहता नागरिकांनी सतर्क रहावे. ग्राम सुरक्षा यंत्रणा सक्षम करावी.तरुणांनी रात्रगस्त सुरू करावी असे आवाहन सपोनी सुधीर पाटील यांनी केली आहे.