Skip to content

किसनवीर सातारा सह. साखर कारखाना भुईंज ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड करावा- प्रशांत तरडे

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याने डिसेंबर महिन्यात नेलेल्या उसाची बिले अद्याप दिलेले नाहीत. कारखान्याला ऊस देणारे शेतकरी गेले चार महिने उसाच्या पैशाची वाट पाहत आहेत. ऊस तोडणी नंतर पंधरा दिवसात ऊस बिले अदा करणे बंधनकारक असताना अद्याप पैसे मिळाले नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. किमान गुढीपाडव्याला तरी शेतकऱ्यांचे पैसे मिळणार का असा सवाल शिवसेनेचे सातारा जावली विधानसभा प्रमुख प्रशांत तरडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. गुढीपाडव्यापर्यंत उसाचे बिल न मिळाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा तरडे यांनी दिला आहे.

पन्नास हजारांपेक्षा जास्त सभासद असलेल्या सदर साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांचा ऊस कारखान्याने तोडू नेला परंतू जवळपास १६ डिसेंबर २०२४ पासून ऊस बीले थकीत आहेत. मुळात शासन निर्णयाप्रमाणे साखर कारखाने ऊस तोडणी करून गेल्यापासून १५ दिवसांचे आत एफ .आर.पी. ची रक्कम देणे बंधनकारक असतानाही ती दिली जात नाही . मध्यंतरीच्या काळात खुप मोठी मोठी आश्वासने देत भुईंज खंडाळा कारखान्याच्या निवडणूका जिंकल्या परंतू निवडणूक काळात दिलेली सर्व आश्वासने पोकळ व खोटी तसेच दिशाभूल करणारीच ठरली असे म्हणावे लागेल. कारण एक भाऊ महाराष्ट्र राज्याचे मंत्री व साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच सातारा जिल्हा बँकेचे संचालकही तर दुसरा भाऊ राज्यसभा खासदार , व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असतानाही ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना वाऱ्यावर सोडलेले दिसत आहे. मा .एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना सदर कारखान्यास ५०० कोटीपेक्षा जास्त रक्कम थकहमी मिळवून देवूनही तीच परिस्थीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सोसायटी व बँकाची कर्जे कशी फेडायची हाच यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून या वर्षीची तरी वर्षा अखेर पर्यंतची एफ .आर .पी . मिळणार का? आणि गुढी पाडवा गोड होणार का? जर गुढी पाडव्या पूर्वी एफआरपी ची सर्व रक्कम मिळाली नाही तर साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रशांत तरडे यांनी दिला आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!