Skip to content

स्वयंभू वैराटेश्वराच्या दर्शनासाठी वैराटगडावर शिवभक्तांची गर्दी.

बातमी शेयर करा :-

स्वयंभू वैराटेश्वराच्या दर्शनासाठी वैराटगडावर शिवभक्तांची गर्दी. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त गडावर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन : श्रावण सहलीसाठी गिर्यारोहकांची सुद्धा वैराटगडाला पसंती :जावली तालुक्याचे ऐतिहासिक वैभव ‘ किल्ले वैराटगड’ सूर्यकांत जोशी कुडाळ – हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्त शिवभक्तांनी आज वैराटेश्वराच्या दर्शनासाठी वैराटगडावर गर्दी केली .श्रावणी सोमवार निमित्त गडावर श्री वैराटेश्वरांना पहाटे महा अभिषेक करण्यात आला.तसेच रविवार पासून विविध धार्मिक कार्यक्रम व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

वैराट गडावर जाण्यासाठी रस्ता नाही. वैराटगड चढण्यासाठी केवळ पाय वाटणे जावे लागते त्यामुळे श्रावण सहलीसाठी गिर्यारोहक वैरागडाला पसंती देतात. जावलीच खोर म्हंटल की सर्वसाधारण पणे सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक काळाची आठवण होत असते.परंतू त्या पलीकडे जाऊन पाहिले तर बरेच काही ऐतिहासिक वैभव आपल्याच अजुबाजुला असल्याचा सुखद आनंदही मिळतो. जावली तालुक्यातील वैराटगडाचा इतिहास सुद्धा असाच आहे.

या गडावर अलिशान गाड्या पोहचू शकत नाहीत.त्यामुळे हा गड सुखासीन पर्यटकां पासून दूर राहिला. परंतू इतिहासाची ओढ असणारे आणि गिर्यारोहनाचा आनंद घेण्यासाठी एकदिवसाची सुरक्षित सहल करण्यासाठी येणार्या पर्यटकांना हा गड नेहमीच खुणावत असतो. कमी गर्दी असणारा सहलीसाठी असे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुद्धा पर्यटक वैराटगडावर भ्रमंती करण्यासाठी पसंती देत असतात.

या गडाची सफर करताना काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे. या गडावर लोक वस्ती नाही. किंवा कोणतीही दुकाने नाहीत. जेवण,पाणी, खाद्यपदार्थ, आवश्यक प्राथमिक उपचार औषधे बरोबर घेऊनच यासहलीचा आनंद घेता येईल. संपूर्ण प्रवास पायवाटेने करावा लागणार आहे. पुणे ते सातारा दरम्यान महामार्गावर पाचवड बसस्थानका वर उतरले की उजव्या हाताला एक शिव पिंडीच्या कातळ रचनेचा डोंगर खुणावत असतो.एकूणच लांबून दिसत असलेल्या आकारावरून हा ऐतिहासिक ठेवा असल्याचे सहज समजू शकते. अगदी कुतूहल म्हणुन एखाद्या स्थानिकाला या डोंगराकडे बोट करुन त्याबाबत विचारणा केली तर या ऐतिहासिक वैराटगडाची महती तो अभिमानाने सांगू लागतो.

वैराटगडाचा उत्तर व पूर्व भाग वाई तालुक्यात तर दक्षिण व पश्चिम भाग जावली तालुक्यात येतो.पाचवड पासून हा गड अगदी हाकेच्या अंतरावर असावा असाच आभास होतो. या गडावर जायला दोन वाटा आहेत . उत्तरेकडून पाचवड-व्याजवाडी गावातून या गडावर जाता येते तर गडाच्या दक्षिणेकडील सरताळे-गणेशवाडीतून किंवा म्हसवे गावातून ही या गडावर जाता येते . या गडावर कोणतेही वाहन जाण्यासाठी रस्ता नाही. हा गड पायवाटेने चालतच चढावा लागतो.गड खडय़ा चढणीचा आहे.पण सरताळे मार्गे दक्षिण बाजू थोडीशी सुकर आहे. . सरताळे गावात येताच वैराटगडाचे विशाल रुप दिसू लागते. अगदी शंभू महादेव महादेवाच्या पिंडी प्रमाणे या गडाचा आकार दिसतो. सह्याद्री पर्वतांच्या रांगेवर हा वैराटगड आहे .

या गडाची उंची १२०० मीटर आहे. गडाच्या पूर्वेला खिंडीतून व्याजवाडीकडे जाता येते. वनविभागाच्या माध्यमातून जंगल संरक्षण करण्यात येत असल्याने या गडावर आता वनराई दिसू लागली आहे. अनेक जंगली प्राणी,पशु पक्षांचे वास्तव्य या गडाच्या गर्द झाडीत आहे.पावसाळ्यात या डोंगरातून वाहणारे झुळझुळ पाणी खुणावत असते.उन्हाळ्यात राकट व उग्र देहाचा हा वैराटगड दिसतो पण पाऊसकाळ आणि हिवाळ्यात हा गड हिरवाईने नटलेला पाहणे भाग्याचेच ठरते. यामुळे वैराटगडाच्या भटकंतीसाठी दसरा दिवाळीतील हिरवळीचे दिवस छान वाटतात. या दिवसांत या डोंगरालाही कोमलता येते. जागोजागी वाहणारे झरे व फुटलेले पाझर पाहण्यात वेगळाच आनंद मिळतो. हिरवागार डोंगर आणि त्याचे कातळ रूप दाट धुक्यात बुडून जात असते . वैराटगडाचे या दिवसांतील हेच स्वर्ग सुंदर रूप अनुभवण्यासाठी गडावर सकाळी लवकर निघणे सोयीचे ठरते.मळलेली वाट पावलांना ओला स्पर्श देत हिरवाईतून वर निघते. भोवतीने सर्वत्र गवताची ती नव्हाळी सुखावत असते. नजर थोडी स्थिरावली, की तिच्या अंगावरील ते चमचमते डोळेही खुणावू लागतात. तेरडा, सोनकी, कवल्या, नभाळी, आभाळी, केणा, फुलकाडी, गेंद, पंद असे हे असंख्य लुकलुकणारे डोळे. नाना रंग-रूपाची ही लडिवाळ बाळे. साऱ्या वाटेवरच आपल्याशी बोलत असतात. निसर्गाच्या या सुंदर पऱ्यांचे सौंदर्य नजरेत साठवत आपण गडाच्या जवळ पोहोचतो. ही पाऊल वाट कडय़ाला पर्यंत पोहचते .

एवढय़ा वेळेचा गवतमातीचा तो मृदुपणा नाहीसा होत कातळाचे रांगडे रूप पुढय़ात येते. जवळपास शंभरएक फूट उंचीचा हा कातळ कडा आहे . आणि त्याच्या डोक्यावर वैराटगडाचे पठार आहे. या कातळकड्याला वळसा घालत गडावर जाण्यासाठी वाट निघते. या वाटेवरून चालत असतानाच कड्याच्या काळ्याभोर पाषाणाला बिलगलेली मधमाशांची पोळी दिसतात. यातील आगी मव्हाचे रौद्र रूप थरकाप उडवणारे असते. या कड्याच्या कातळ खोबणीत खोदलेली तळी लक्षवेधी आहेत.या पाण्याची चव अगदी अमृता प्रमाणेच आहे. हे निळेशार शुद्ध पाणी पिण्याचा मोह आवरणे कठीणच असते.या कड्याभोवती सलग पाच तळी आहेत.

या गडावर पांडवांचे अज्ञात वासाच्या काळात ही पाच तळी खोदलेली असल्याची अख्यायिका सांगितली जाते. या तळ्यांपासूनच गड माथा जवळ आला असल्याची चाहुल लागते.तिथूनपुढे पायऱ्या सुरू होतात. गडाला सलग दोन दरवाजे होते हे त्यांच्या कमानीच्या ढासळलेल्या अवशेषा वरून दिसते.तरीसुद्धा त्याठिकाणी भिंती, उंबरा, अलंगांनी यांच्या पाऊल खूणा अद्यापही कायम आहेत. या कमानीतून आत शिरताच थंडगार वारा गड चढल्याचा पूर्ण शीन घालवतो. लांबून चिंचोळा वाटणारा हा गड वर आल्यावर मात्र एखाद्या गवताळ मैदानाप्रमाणे समोर दिसतो.या पठारावरील हिरवळ आणि डौलणारी रंगबिरंगी फुले मन मोहवून टाकतात. या पठारावरची भ्रमंती करताना एक एक ऐतिहासिक वैभवाचे दर्शन होते. सदर, वाडे, शिबंदीची घरे अशा अनेक बांधकामांचे अवशेष दिसून येतात.तिथेच उजव्या हाताला मारुतीरायाचे छोटेखानी मंदिर आहे.मंदिराच्या आत आणि बाहेर अशा दोन ठिकाणी मारुतीच्या पाषाण मूर्ती आहेत. या मूर्तींना भाविक वरचेवर शेंदूर लेप करत असल्याने या सर्व उद्धवस्त ढिगाऱ्यात या तेजरुप मूर्ती लक्षवेधी ठरतात. काही शिवभक्तांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान केले आहे.

तिथून पुढे या गडाचीदेवता वैराटेश्वराचे मंदिर दिसते.महंत गगनगिरी महाराजांचे परमशिष्य आबानंद महाराजांनी परिसरातील भाविकांच्या सहकार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.या ठिकाणी सभामंडप, गाभारा अशी रचना आहे. गाभाऱ्यातील महादेवाची पिंडी चे दर्शन मनाला सुखावते.ही स्वयंभू पिंडी साक्षात शंभूमहादेवांचे दर्शन झाल्याची अनुभूती देते. सभामंडपात एक उभे केलेले शिल्प आहे. त्याला वीरगळ म्हणतात. एखाद्या चांगल्या कारणासाठी कुणाला वीरमरण आल्यास त्याचे पूर्वी स्मारक उभे केले जायचे. या स्मारकास वीरगळ म्हणतात. या वीराच्या या पराक्रमाची माहिती शिल्पपटातून त्यावर कोरलेली असते. इथला हा वीरगळ यादव काळातील असल्याचे सांगितले जाते. ऐतिहासिक दाखल्यांनुसार शिलाहार राजा भोजने हा गड ११७८ ते ९३ या काळात बांधला आहे.प्राचीन वैराट ऊर्फ विराटनगरी म्हणजेच आजच्या वाई शहराचा पाठीराखा म्हणून याचे नाव वैराटगड ठेवले गेले.

शिवकाळातील कवी रवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत या संस्कृत काव्यग्रंथात या वैराटनगरीचा उल्लेख आला आहे. शिलाहारानंतर यादव, आदिलशाही, शिवशाही, मुघल पुन्हा मराठे आणि शेवटी इंग्रज असे हे इतिहासातील थांबे या गडाने अनुभवले. औरंगजेबाने इसवी सन १६९९ मध्ये हा गड जिंकून घेतला. या काळातच गडाचे कधीतरी सर्जागड असेही नामकरण झाल्याचेही इतिहास सांगतो गडाला आवश्यक ठिकाणी मजबूत तटबंदी आहे.

सातारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये हा तट १७ फूट उंच आणि चांगलाच जाडजूड असल्याची नोंद आहे. आज हा तट ढासळला असला तरी त्याची एकेकाळीची भव्यता लक्षात येते.सर्पाकार फिरणाऱ्या या तटावर जागोजागी बुरूज, मारगिरीच्या जागा, ढालकाठीची रचना, शोचकुपांची योजना. या तटातूनच पश्चिम अंगाने एक चोरवाट चोरपावलांनी खाली उतरते. पाण्याच्या खोदलेल्या टाक्या, तळी, शिबंदीची घरे असे बरेच काही दिसत असते. खरेतर हे सारे उद्ध्वस्त अवशेषांचे ढिगारे आहेत. पण ते एके काळच्या आपल्या वैभवशाली अस्तित्वाची साक्ष देत आहेत.

या तटावरुन फेरी मारताना चौफेर असा दूरदूरवरचा प्रदेश नजरेत भरतो.उत्तरेला महाबळेश्वर व वाईचे कृष्णा नदीचे खोरे, तर दक्षिणेकडे कुडाळी आणि वेण्णा नद्यांची जावलीच्या खोर्यातील हिरव्यागार निसर्ग सौंदर्यातचे रमणीय दृश्य दिसते.हिरवी शाल पांघरलेले निळे-जांभळे डोंगर म्हणजेच पांडवगड, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वर, खंबाटकी, चंदन-वंदन, नांदगिरी, जरंडेश्वर, मेरूलिंग अशे विविध ऐतिहासिक गडकोट आणि धार्मिक स्थळांच्या गिरीशिखरे खुणावत असतात. गडावरुन परतीचा प्रवास करताना दरवाजाजवळ येक एक गोलाकार तळे लक्ष वेधून घेते. निळ्याशार पाण्याने भरलेले हे तळे म्हणजे एक अद्भूत अनुभूती देते. या तळ्यातील शांत पाण्यात आपल्या स्वतःचे प्रतिबिंब पाहून प्रसन्न मनाने अंधार पडण्यापूर्वी सुरक्षित पणे गडउतार होणे हिताचे ठरते.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!