प्रति पंढरपूर करहरनगरी हरी नामाच्या गजराने दुमदुमली :

विठू माऊलीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

सूर्यकांत जोशी कुडाळ- आज आषाढी एकादशी निमित्त प्रतिपंढरपुर करहर ता.जावळी येथील विठूरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम ‘व हरीनामाच्या जयघोशाने संपूर्ण करहर परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी 7 वाजता आमदार श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते तसेच जावळीचे माजी आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीची महापूजा करण्यात आली.यावेळी करहर येथील तीन वारकरी दाम्पंत्यांनाही विठुरायाच्या पुजेचा मान देण्यात आला. यावेळी तहदिलदार हणमंत कोळेकर, नायब तहसीलदार संजय बैलकर, जावळी – महाबळेश्वर बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, मेढा पोलिस स्टेशनचे सहा पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, करहरच्या सरपंच सैा. सोनाली यादव, उपसरपंच प्रदीप झंडे , ग्रामस्थ प्रसाद यादव, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पुजारी संतोष खिस्ते व ग्रामस्थ उपस्थित होते,
जावली बँकेचे संस्थापक ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या संकल्पनेतून येथील दिंडी सोहळायला विशाल स्वरूप प्राप्त झाले. गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा अव्याहत सुरु आहे. वयोमाना नुसार तसेच कामाच्या व्यापातून ज्यांना पंढरपूरला जाता येत नाहीत असे भाविक प्रतिपंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला येतात.पहाटे पासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची रांग लागली होती.त्याकरिता रांगेत दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि पुरुष भाविकांना दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा मधून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या दिंडी सोहळ्याला ह. भ. प. दत्तात्रयमहाराज कळंबे यांचे जन्म गाव असलेल्या दांडेघर येथून प्रारंभ होतो. महाराजांची कर्मभूमी असलेल्या बेलोशी येथे या दिंडीचा मुक्काम होतो रात्रभर भजन कीर्तनात वारकरी तल्लीन होतात. सकाळी नऊ वाजता या दिंडी सोहळ्याचे प्रति पंढरपूर करहर च्या दिशेने प्रस्थान झाले.या सोहळ्यात परिसरातील विविध गावातुन संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज व संतांच्या पालख्या सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्यात तालुक्यातील शाळा महाविद्यालय तसेच शासनाच्या विविध खात्याचे चित्र रथ सहभागी झाले होते. विठूमाऊलीच्या मंदिरा जवळ वारकरी दींड्या एकत्र आल्याने विठ्ठल नामाचा जयघोष करीत भक्तांचा महासागरच तयार होतो.
मेढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता..यावेळी डी एम के जावली सहकारी बँक,लालसिंगराव शिंदे सहकारी पतसंस्था यासह विविध सामाजिक संस्थांच्या व राजकीय पक्षांच्या वतीने जागोजागी अल्पोहर फळे, खिचडी, या उपवासच्या पदार्थाचे वाटप करण्यात आले.तसेच भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.