..तर सरकार मान्य दारू दुकाने सुरु करा : कुडाळ येथील बैठकीत मागणी

सूर्यकांत जोशी कुडाळ –
दारूच्या व्यसनामुळे सर्वसामान्य जनतेचे उध्वस्त होणारे संसार वाचावेत या उदात्त हेतूने जावली तालुक्यातील सर्व सरकार मान्य दारू दुकाने बंद करण्यात आली. यासाठी तालुक्यातील महिला,व्यसनमुक्ती युवक संघ व सामाजिक संघटनानी पुढाकार घेतला होता. परंतु काही दिवसांतच तालुक्यातील गावागावात अगदी गल्ली बोळात अवैध पणे दारू विक्री सुरु झाली. सध्या तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असून दारू बंदीचा हेतूच साध्य होत नसल्याने सरकार मान्य दारू दुकाने सुरु करावीत याबाबतची मागणी कुडाळ येथे झालेल्या सर्वपाक्षीय बैठकीत काही गावातील प्रमुखांनी केली.
Bजावली तालुक्यातील विविध समस्या तसेच रोजगार निर्मिती व सर्वांगीणविकास या वर विचार विनिमय करण्यासाठी कुडाळ येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र परामणे, हणमंतराव पार्टी, बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र शिंदे. बाजार समितीचे उपसभापती हेमंत शिंदे,कुडाळचे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे,समाधान पोफळे, सुनील रासकर . अजय पाडळे,अजय शिर्के,तसेच व्यापारी व व्यावसायिक उपस्थित होते.संदीप परामणे यांनी प्रास्ताविक केले.
तालुक्यातील सर्वांगीण विकासाच्या मुद्यावरील या बैठकीत इतर विषयांपेक्षा सरकार मान्य दारू दुकाने सुरू करावीत याबाबतच अधिक चर्चा झाली. अवैध व्यवसायावर वेळोवेळी कारवाई होऊन सुद्धा हे धंदे पून्हा जोमाने डोके वर काढतात.तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याने सरकारमान्य दारू दुकाने सुरू करावीत असा विचार होणे स्वाभाविक आहे. परंतु सरकारमान्य दारू दुकाने सुरू केल्यासच व्यवसायांना चालना मिळेल याबाबत मात्र अनेकांचे मतमतांतर दिसून येत आहे.
वास्तविक कोणतेही व्यसन असो ते प्रमाणापेक्षा जास्त झाले की ते घातकंच असते. त्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्याने व्यसनापासून दूर रहावे अशी भावना प्रत्येकालाच वाटत असतें. याच भावनेतून तालुक्यातील सरकार मान्य दारू दुकाने बंद करण्याचा उपक्रम विलास बाबा जवळ यांच्या पुढाकाराने व्यसनमुक्त युवक संघ,महिला संघटना, व सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी जावली तालुक्यात राबवला. त्यावेळी यासाठी फारसे राजकीय पाठबळ लाभले नाही. तो एक सर्वसामान्य जनतेतून झालेला उठाव होता.सरकार मान्य दारू दुकाने बंद झाल्यास तालुक्यात सहज दारू मिळणार नाही. आणि दारू पिणारे या व्यसनापासून परावृत्त होतील अशी अपेक्षा होती.
जावली तालुक्यातील दारू दुकाने बंद करण्याचा उद्देश -सामाजिक शांतता व सलोखा राहावा, भावी पिढी व्यसनापासून दूर रहावी, दारूच्या व्यसनामुळे होणारे वादविवाद, भांडणे , गुन्हेगारीला आळा बसावा,महिला व मुलांना कुटुंबातील दारुड्यासदस्या मुळे होणारी मारहाण, शिवीगाळ टाळली जावी. यातून कुटुंबाचे होणारे आर्थिक नुकसान टाळळे जावे, मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम, होणारे वाईट संस्कार,जाचास कंटाळून होणाऱ्या आत्महत्या टाळता याव्यात, तसेच अशा व्यक्तीची व कुटुंबाची सामाजिक पत प्रतिष्ठा राखली जावी अशा चांगल्या हेतूने दारू बंदी करण्यात आली होती .महिला शक्तीने दिलेल्या या यशस्वी लढ्याची नोंद राज्याच्या इतिसात झाली आहे. परंतु या लढ्याला पोखरण्याचे काम अवैध दारू धंदेवाल्या भुंग्यांनी केले.
अवैध दारू विक्री अथवा व्यवसायांना अभय किंवा वरदहस्त कोणाचा हा एक कळीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर अवैध व्यवसायांना प्रतिबंध करणारे कायदे तितकेसे कडक नाहीत. परिणामी अवैध व्यावसायिकांना कायद्याचा धाक नाही. त्यामुळे कारवाई झाल्यानंतर लगेच हे धंदे पुन्हा डोके वर काढतात. अवैध व्यावसायिकांच्याकडून हफ्तेबाजी होत असल्याचा आरोप पोलिसांवर नेहमीच होत असतो.
दारू पिणारे श्रीमंत आणि गरीब दोन्ही वर्गातील लोक आहेत. श्रीमंत उच्च प्रतीची दारू पितात त्याला ड्रिंक्स घेणे म्हणतात तर गरीब हलक्या प्रतीची दारू पितात त्याला बेवडा म्हणतात हा फरक आहे. कोणी मानसिक ताण कमी करण्यासाठी तर कोणी शारीरिक ताण कमी करण्यासाठी तर कोनी हौस , मजा म्हणून दारूचे घोट रिचवतात. एकूणच सामाजिक मानसिकता पाहिली तर कष्टकरी वर्गाला दारूची अधिक गरज असल्याचे दिसून येते. मजूर वर्ग कामावर येण्यापूर्वीच सोय होणारका हे मालकाला विचारतो अशी परिस्थिती आहे. तर. कधी दिवसभर कष्ट करून डबल महाग असलेली अवैध विक्रेत्याकडून दारू घेतो. त्यामुळे दारू बंदीला चांगली व वाईट अशा दोन्ही बाजू आहेत असे दिसून येते.आता पुन्हा दारू दुकाने सुरु करायची असतीलतर लोक भावना, ज्याठिकाणी महिला मतदानाने दुकाने बंद झाली त्याबाबत कायदेशीर तरतूद या गोष्टीही विचारात घ्याव्या लागतील.
जावली तालुका दारू मुक्त करावा या चांगल्या हेतूने तालुक्यातील सरकार मान्य दारू दुकाने कायाद्याच्या चौकटीत राहून बंद करण्यात आली. परंतु दारू पिणारांची तोंडे बंद करण्यासाठी व्यापक समुपदेशन व सामाजिक प्रयत्न कमी पडले. आणि हे कोणी एक व्यक्ती करू शकत नाही. जसा दारूबंदी करण्यासाठी जनतेतून उठाव झाला. तशाच सामाजिक बांधिलकीच्या उठावाची गरज पिणाऱ्यांची तोंडे बंद करण्यासाठी होणे आवश्यक होते. आणि त्याला राजकीय नेत्यांनीही पाठबळ देणे आवश्यक होते.
तसे न झाल्याने दारूबंदी पश्चच्यात चित्र – दारू पिण्यासाठी लोक अन्य तालुक्यात जाऊ लागले, अवैध दारू धंदे गावोगावी गल्लीबोळात सुरु झाले, अनेक सुशिक्षित बेकार तरुण सहज पैसे मिळवण्यासाठी अवैध दारू धंद्यात ओढले गेले. काही शालेय विद्यार्थी शहरातून दारूच्या बाटल्या घेऊन येऊ लागलेत. पिणारांची संख्या वाढली, अवैध दारू विकत घेण्यासाठी दुप्पट पैसे खर्च होत आहेत.जावली तालुक्यात दारू बंदी रहावी यासाठी बाहेरील तालुक्यातून फंड मिळत असल्याची चर्चा.
तालुक्यात दारू मिळत नसल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे बोलले जाते परंतु त्याच्याही काही वेगळ्या कारण मीमांसा शोधणे गरजेचे आहे. बाजार पेठा ओस पडण्याचे प्रमुख मुद्दे – ग्राहकांना सुविधाचा अभाव, व्यावसायिक स्पर्धा, दर्जा व दर या बाबत ग्राहकांची वाढती अपेक्षा , खेडोपाडी सुरु झालेले छोटे मोठे व्यवसाय व त्यामुळे मोठया बाजार पेठावर होणारा परिणाम,ऑनलाईन होणारी खरेदी, लोकांच्याकडे उपलब्ध असणारी स्वतःची वाहने व अधिक पसंतीला वाव मिळावा यासाठी शहराकडे जाणे. मॉलमध्ये खरेदी करण्याचा मोह. पर्यटन अथवा औद्योगिकीकरणाचा अभाव.
ठोस उपाय योजणांची आवश्यकता
जावली तालुका हा डोंगराळ व दुर्गम आहेच परंतु तो निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. त्यामुळे जावली तालुक्याच्या विकासाबाबत व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे. केवळ चर्चा न करता त्यावरचे उपायही शोधले पाहिजेत आणि केले पाहिजेत. शिक्षण,पर्यटन, व्यापार,शेती,लघुउद्योग,शेतीपूरक व्यवसाय, कृषीमाल प्रक्रिया उद्योग, दळणवळण औद्योगिकीकरण अशा अनेक पैलूंचा अभ्यास करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
..