जावली तालुक्यातील म्हसवेच्या गणेशोत्सव मंडळांचा विधायक उपक्रम : गावाला देणार सी सी टीव्हीचे सुरक्षा कवच

सूर्यकांत जोशी कुडाळ – वडाचे म्हसवे ता. जावली येथील गणेशोत्सव मंडळानी उत्सवात अनावश्यक खर्चाला फाटा देऊन गावात सी सी टीव्ही यंत्रणा बसावण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गावाला सुरक्षा कवच देणाऱ्या या विधायक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या वटवृक्षासाठी जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे हे गाव सुप्रसिद्ध आहे. या गावात वैवीध्य पूर्ण उपक्रम राबवण्याची परंपरा आहे. या वर्षी येथील गणेशोत्सव मंडळानी एकत्र येत गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गावात मोक्याच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे निर्णय घेतला आहे. अशी माहिती माजी सरपंच अजय शिर्के यांनी दिली.
म्हसवे गावचे माजी सरपंच अनिल जगन्नाथ शिर्के यांनी याबाबत संकल्पना मांडली. तर त्यांनी सातत्याने गावातील जाणता राजा गणेशोत्सव मंडळ, शिवतेज गणेशोत्सव मंडळ, जननी देवी गणेशोत्सव मंडळ, नेहरू युवा मंडळ, ग्रामपंचायत, सोसायटी व ग्रामस्थांना एकत्रित घेत या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या विधायक उपक्रमाला सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होत गावात लगेचच चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
या कामे गावातील गणेश कृष्णा शिर्के, नवनाथ बाबाजी शिर्के, श्रीकांत अंकुश शिर्के, महेश सुरेश शिर्के यांनीही महत्वपूर्ण योगदान दिले. मिथुन गेनबा जाधव यांनी एक सी सी टीव्ही कॅमेरा देऊन सहकार्य केले.गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजूनही 10 ते 12 कॅमेरे बसवायचे असून यासाठी अंदाजे एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. गणेशोत्सवात येणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जमा रकमेतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या या विधायक उपक्रमाची मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर तसेच कुडाळ पोलीस दुरुक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी प्रशंसा केली .