प्रतापगड कारखाना ऊस दराबाबत घेतला धाडसी निर्णय :शेतकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत

कुडाळ – जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्यात गाळपासाठी येणान्या ऊसाला प्रति टन तीन हजार रुपयांचा दर देण्याचा धाडसी निर्णय आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी घेतला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.
जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे हीत पाहून आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनी अजिंक्य तारा कारखान्याच्या माध्यमातून भागीदारी तत्वावर प्रतापगड कारखाना चालविण्यासाठी घेतला आहे.या वर्षी अजिंक्यतारा – प्रतापगड उद्योग समुहाच्या वतीने पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे सुरु आहे. प्रतापगड कारखाना बंद असल्याने गेल्या चार वर्षात वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे ऊस दराबाबत कोणतीही शंका व अपेक्षा न बाळगता प्रतापगड कारखाना चांगला चालला पाहिजे या उद्देशाने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून कारखान्याला स्वयं स्फूर्तीने ऊस दिलाआहे.
शेतकऱ्यांनी ऊस देऊन दिलेल्या प्रतिसादाला साद देत आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांनीही ऊसला अपेक्षित भाव देण्याचा निर्णय घेतला.अजिंक्य प्रतापगड कारखाना ऊसाला तीन हजार दर देणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आ. शिवेंद्रसिंह राजें भोसले यांच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांच्या वतीने चेअरमन सौरभ शिंदे यांनी आभार मानले.