Skip to content

जावलीत आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. शशिकांत शिंदेची प्रतिष्ठा पणाला:लोकसभा निवडणुकीला विधानसभेचा रंग 

बातमी शेयर करा :-

 

   

सूर्यकांत जोशी कुडाळ – दि.7 मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणूकीला जावळी तालुक्यात विधानसभा निवडणूकीचाच रंग चढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निवडणुकीत महायु्तीकडून श्री. छ. उदयनराजे उमेदवार आहेत. परंतु जावली तालुक्यात मात्र आ. शिवेंद्रसिंह राजे विरुद्ध आ. शशिकांत शिंदे यांच्या मध्येच ही लढत होत असल्याचा भास निर्माण होत आहे. त्यामुळे जावली तालुक्यात या दोन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

                  मतदार संघ पुनर्रचनेनंतर  आ. शशिकांत शिंदे यांना कोरेगाव विधानसभा मतदार संघात विस्थापित व्हावे लागले. परंतु तत्पूर्वी जावली विधानसभा मतदार संघांचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करताना ते अगदी अबाल वृद्धांच्या गळ्यातील ताईत बनले होते. त्या नंतर सातारा जावली विधानसभा मतदार संघाला आ. शिवेंद्रसिंह राजेंचे नेतृत्व लाभले. सुरुवातीच्या काळात जावळीतील नेते, कार्यकर्ते व जनतेच्याही मनात शिवेंद्रराजेंच्या नेतृत्व गुणाबाबत साशंगता होती. परंतु अल्पावधीतच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या नेतृत्व गुणाने जावली तालुक्यातील जनतेला प्रेम व विश्वासाने आपलेसे केले. त्याच वेळी जावळीतील लोकांचा शशिकांत शिंदे यांच्याकडे अधिक ओढा होता. व छोट्या मोठ्या प्रश्नात आ. शशिकांत शिंदे यांचा जावलीत राजकीय हस्तक्षेप दिसून येत होता. त्यामुळे तालुक्यात दोन्ही आमदारांचे स्वतंत्र गट निर्माण झाले होते.गेल्या दहा वर्षात ही गट बाजी मोडून काढण्यात आ. बाबाराजेंना बहुतांश यश आले. परंतु आजही तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्था यांच्या निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा गट आपले अस्तित्व दाखवतोच. तर अशा अनेक निवडणुकीच्या माध्यमातून हे दोन्ही आमदार आमने-सामने येत असल्याचे दिसून येते.

            त्यामुळे आताच्या लोकसभा निवडणुकीत आ शिवेंद्रसिंह राजे विरुद्ध आ. शशिकांत शिंदे अशीच लढत असल्याची भावना व उत्साह कार्यकर्त्यां मध्ये दिसून येत आहे.आज पर्यंत राष्ट्रवादी पक्षात राहून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठीशी भक्कम उभे असलेल्या ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे व प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने जावलीत आ. शिवेंद्रसिंहराजेंचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे. लोकसभेची ही निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच असून जावली तालुक्यावर नक्की कोणाचे अधिराज्य आहे हे स्पष्ट होणार आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!