Skip to content

जावली तालुक्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला : प्रचारासाठी कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व महाविकास आघाडीचे अमित कदम यांच्यात मुख्य लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला असून कार्यकर्त्यांत अभूत पूर्व उत्साह दिसून येत आहे . आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे अनेक नामवंत सरदार व सैन्याचा फौंजफाटा असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचारासाठी चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.त्या तुलनेत महाविकास आघाडीचे अमित कदम यांना ऐनवेळी (उभाटा )शिवसेनेचे उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्याकडे तुलनेने कार्यकर्त्यांचे बळ कमी दिसून येते. तरीसुद्धा मिळालेली संधी ध्यानात घेऊन त्यांनीही प्रचारात चांगलीच रंगत आणली आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पंधरा वर्षात सातारा विधानसभा मतदारसंघात तसेच जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. त्याचबरोबर सक्षम कार्यकर्ते ही तयार केले आहेत. आमदारकीसह अजिंक्यतारा कारखाना, सूतगिरणी, जिल्हा बँक, तसेच विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक सत्ता स्थाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहेत. जावली तालुक्यात प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला बळ देऊन हा कारखाना सुरळीत सुरू केल्यामुळे सभासद,कामगार, ऊस उत्पादक व हीतचिंतकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रेम व विश्वास निर्माण केला आहे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना दिलेले बळ यामुळे ही निवडणूक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातात घेतलेली दिसून येत आहे. कार्यकर्ते स्वतःहून लोकांच्या दारात जाऊन शिवेंद्रराजेंचा प्रचार करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आमदार शिवेंद्रसिंह राजेंच्या प्रचाराला भरभरून प्रतिसाद देत असताना दिसून येत आहे. एकूणच प्रचारातील आघाडी पाहता आमदार शिवेंद्रसिंह राजांचा विजय मोठ्या फरकाने होईल असा विश्वास सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

जावली तालुक्यातून ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेच्या संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, माझी सभापती सुहास गिरी, सौ जयश्री गिरी, अरुणा शिर्के, रवींद्र परामणे, हनुमंतराव पार्टे, मच्छिंद्र मुळीक,संदीप परामणे, यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे आजी माजी संचालक इत्यादी प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसह आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचा प्रचार केला जात आहे. त्याचबरोबर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे एकनाथ रोकडे व शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ धनावडे, प्रशांत तरडे व कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेऊन आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचा प्रचार करत आहेत.शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून गणपती, दसरा,दिवाळी अशा सणासुदीत मिळालेली आर्थिक मदत यामुळे महिला वर्गात सुद्धा उत्साहाचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये असणाऱ्या अनेक शंका आणि अडचणी ध्यानात घेऊन विविध प्रकारचे उपाययोजना करण्यात आल्या. अनेक लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण केले त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मध्ये असणारा रोष विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनात दिसून येत नाही त्यामुळे राज्यात सुद्धा महायुतीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यावेळी मंत्रीपदाची संधी हमखास मिळणार असा विश्वासही जनतेतून व्यक्त होत आहे.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती अमित कदम यांना ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करावा लागला. अमित कदम यांच्याकडे फारशी कोणतीही सत्तास्थाने नाहीत. त्याचप्रमाणे नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा फार मोठा फौज फाटा ही नाही. एवढ्या कमी वेळात संपूर्ण विधानसभा मतदारसंघात जनतेपर्यंत पोहोचून पक्षाचे चिन्ह पोहोचवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. तरीसुद्धा गेल्या पंधरा दिवसांमध्ये त्यांचे कार्यकर्ते व सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कोरेगाव मतदार संघात मध्ये व्यस्त असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनीही या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेत कार्यकर्त्यांना नोटाचा अधिकार वापरण्याचे कानमंत्र दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची तालुक्यात नगण्य ताकद आहे. अशा परिस्थितीत माजी आमदार सदाशिव सपकाळ, ज्येष्ठ नेते एस एस पार्टे गुरुजी यांच्यासह असणाऱ्या मोजक्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह अमित कदम निवडणुकीच्या मैदानात चांगलीच लढत देत असल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!