जावलीत अवैध दारू विक्री सुसाट : अवैध पेक्षा वैध बरी म्हणण्याची वेळ, अवैध व्यवसायांना लगाम घालण्याचे जबाबदारी कोणाची ?

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील सरकार मान्य दारू दुकाने बंद होऊन वीस वर्षांचा काळ लोटला आहे. दारूची दुकाने बंद झाल्यास दारूच्या व्यसनापासून लोक परावृत्त होतील आणि सर्व सामान्यांचे संसार सुखाचे होतील असे अपेक्षित होते.आणि त्या हेतूने व्यसनमुक्त युवक संघ, महिला संघटना आणि सामाजिक संघटनांच्या सामूहिक प्रयत्नाने जावली तालुक्यात जेमतेम आठ असणारी सरकार मान्य दारू दुकाने बंद करण्यात आली. परंतु त्यानंतरच्या कालावधीत जावली तालुक्यात अवैध दारू विक्री सुसाट होऊ लागली. गावोगावी गल्ली बोळात शेकडो अवैध दारू विक्रेते तयार झाले आहेत त्यामुळे आता अवैध पेक्षा वैध बरी होती असे म्हणण्याची वेळ आली आहे.
महिलांनी गावातील दारू दुकान बंद करण्याबाबत बहुमत दाखवल्यास अधिकृत दारू दुकाने बंद करण्याचे धोरण महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी जारी केले. त्यानुसार जावली तालुक्यात व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष विलास बाबा जवळ यांच्या सह अनेक मान्यवरांच्या माध्यमातून दारूबंदीची चळवळ उभी राहिली. या चळवळीला महिला व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना यश येऊन जावली तालुक्यातील सर्व अधिकृत दारू दुकाने बंद झाली.
त्यानंतरच्या कालावधीत ही चळवळ मोडीत काढण्यात काही शक्तींना यश आले. कोणाला आर्थिक आमिष दाखवण्यात आले तर कोणाला आर्थिक अडचणीत आणण्यात आले. तर कोणी सहज पैसे मिळवण्याच्या हेतूने स्वतः अवैध दारू विक्री करू लागले. तर काही राजकीय पुढऱ्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला या व्यावसायात पाठबळ दिल्याच्या चर्चा होऊ लागल्या त्याच बरोबर पोलीस यंत्रनेवर सुद्धा हप्ते बाजीचे आरोप झाले. आता तर या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या विलासबाबा जवळ हप्ते घेत असल्याचे जाहीर आरोप करत आहेत. हे होत असताना आरोप करणारे दारू बंदी चळवळीत सहभागी होते का. आणि ते सध्या अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी काय प्रयत्न करत आहेत असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो.
दारूबंदीच्या या सामाजिक चळवळीला व्यक्तिगत स्वरूप प्राप्त झाल्यानेच दारूबंदी पश्चात अवैध दारू विक्रीला लगाम घालण्यासाठी सामाजिक उठाव होऊ शकला नाही. म्हणूनच आज जावली तालुक्यात गल्लीबोळात अवैधरित्या दारू विक्री होत आहे. आता अवैध दारू विक्रीचा विषय समोर येताच या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या विलास बाबा जवळ यांच्याकडे बोट दाखवले जाते. ही चळवळ ज्वलंत ठेवण्याची जबाबदारी नेतृत्व म्हणून एकट्या विलास बाबा जवळ यांची होती की या चळवळीत एक दिवसासाठी सहभागी होणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होती असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. या सामाजिक चळवळीला व्यक्तिगत रूप प्राप्त झाल्यामुळे दारूबंदी चळवळ अपयशी झाल्याचे दिसून येते. यशाच्या कौतुकाचे मानकरी होणारे विलास बाबा जवळ आता अपयशाच्या टिकेचे सुद्धा धनी होत आहेत. शासनाने एकीकडे महिलांच्या भावनांचा विचार करून दारूबंदीचे धोरण जारी करत असताना महसुलाच्या हव्यासापोटी दारू उत्पादनाला व विक्रीला सुद्धा तितकेच प्राधान्य दिले. शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा सुद्धा दारूबंदीच्या चळवळीला फटका बसत आहे. दारूबंदी चळवळीने तालुक्यात असणारी शासन मान्यताप्राप्त आठ ते दहा दारू दुकाने बंद झाली. परंतु आज शेकडो अवैध दारू विक्रेते गावागावातील गल्लीबोळात तयार झाले. त्यावर अंकुश ठेवण्यात संबंधित उत्पादन शुल्क विभाग, पोलीस, स्थानिक नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व दारूबंदी चळवळीत सक्रिय सहभाग घेणारे कार्यकर्ते यांनी दुर्लक्ष केले. आता दररोज पोलिसांच्या माध्यमातून कुठे ना कुठे अवैध दारू विक्री करणारा वर कारवाई होताना दिसत आहे. परंतु अवैध धंद्यांबाबत कायद्याचा धाक कमी पडत असल्यामुळे अवैध दारू धंदे करणारे सही सलामत सुटून बाहेर येत आहेत व पुन्हा तितक्या जोमाने हा व्यवसाय थाटत आहेत. अवैध व्यवसायावर टीका होत असताना ती अनेकदा राजकीय नेत्यांवर होते. कोण कोणाचा कार्यकर्ता व्यवसाय करत आहे याकडे बोट दाखवले जाते. तर कधी पोलिसांच्या हप्तेबाजीवर टीकेची झोड उठवली जाते. तसेच दारूबंदी चळवळीच्या अग्रणी असणाऱ्या विलास बाबा जवळ यांच्यावर सुद्धा ते अवैध व्यावसायिकांकडून हप्ता घेतात की काय अशी शंका घेतली जाते. सामाजिक कार्यकर्ते विलास बाबा जवळ हे गेल्या अनेक दशकांपासून व्यसनमुक्तीची चळवळ राबवत आहेत. व्यसनमुक्ती म्हणजे केवळ दारूचेच नव्हे पान, तंबाखू,गुटखा, सिगारेट तसेच आरोग्यास अपायकारक असणाऱ्या नशिल्या पदार्थाविरोधात विलास बाबा जवळ समाज प्रबोधन करत आहेत. भावी पिढी व्यसनाधीन होऊ नये. व्यसनामुळे गोरगरिबांचे संसार उध्वस्त होऊ नये अशी तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवते. आणि त्यांच्या सामाजिक बांधिलकीनुसार ते ही चळवळ राबवत आहेत. समाज हिताच्या या कार्यात समाजाचा सुद्धा तितकाच निस्वार्थ सहभाग असणे गरजेचे आहे. कोणतेही व्यसन हे आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे. एकीकडे कष्टकऱ्यांची गरज म्हणून दारूकडे पाहिले जाते. परंतु याच दारूच्या व्यसनाच्या आहारी कष्टकरी कर्ता पुरुष गेल्यास याच कष्टाचे चीज न होता त्याच्या संसाराची राख रांगोळी होताना दिसून येते. अनेक बाया बापड्यांना व्यसनी नवऱ्याच्या मारहाणीला शिव्या गाळीला सामोरे जावे लागते. यामध्ये अनेक जणींचे जीव जातात. त्याचा परिणाम लहानग्यांच्या शिक्षणावर व संस्कारावरही होत असतो आणि अशा कुटुंबांची पूर्ण वाहतात होत असताना दिसते. अर्थातच कीर्तनाने समाज सुधारत नाही. आणि तमाशाने बिघडत नाही अशी म्हण आहे. दिवसेंदिवस समाज सुशिक्षित होत आहे. काय चांगले काय वाईट समजण्याइतपत तो शहाणा झालेला आहे. त्यामुळे आपण कोणत्या दिशेने जायचं हे ज्याचं त्याने ठरवणं गरजेचं आहे.जावली तालुक्यात सध्या होत असलेली अवैध दारू विक्री पाहता अवैध पेक्षा वैध बरी होती असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
जावली तालुक्यातील सरकारमान्य दारू दुकाने बंद करून तालुका दारू मुक्त करण्याचा हेतू जरी कितीही चांगला असला. हा हेतू सफल झाल्याचे दिसून येत नाही. मध्यंतरीच्या काळात काही जणांनी पुढाकार घेऊन तालुक्यात अवैध दारू विक्रीला रोखण्यासाठी सरकार मान्य दारू दुकाने सुरू व्हावी अशी भूमिका घेतली परंतु या भूमिकेला सुद्धा विरोध झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले.
*अवैध दारू विक्री रोखण्याची जबाबदारी कोणाची : आनंदराव मोहिते पाटील*
महिला भगिनींच्या भावनांचा विचार करून जावली तालुक्यातील सरकार मान्य दारू दुकाने व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद केली.तरी सुद्धा सदर दुकाने बंद करण्यासाठी मतदान घेण्याचा अट्टाहास करण्यात आला. गेली वीस वर्षे सर्वसामान्य कष्टकरी जनतेला दुप्पट तिप्पट दाम मोजून अवैध दारू खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या आर्थिक नुकसान होऊन वेळ वाया जात आहे. अनेक जणांना स्थानिक पातळीवर दारू उपलब्ध होत नसल्याने शेजारच्या तालुक्यातील गावात जात असताना अपघात होऊन जीव गमवावे लागले. काहीजण कायमचे जायबंदी झाले. सरकारमान्य दुकाने बंद करून संबंधितांचा हेतू साध्य झाला का याचा विचार करावा. आज दारूबंदी चळवळीत असणाऱ्या अनेकांचे अवैध दारू विक्री चे व्यवसाय आहेत. तर असे काही जण हप्ते घेत असल्याची चर्चा होते. सरकारमान्य दारू दुकाने बंद करण्यासाठी चळवळ उभी केली. मग गेल्या वीस वर्षात अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी अशी चळवळ का उभी केली गेली नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे. अशी प्रतिक्रिया आनंदराव मोहिते पाटील यांनी व्यक्त केले आहे.