Skip to content

जावली तालुक्यात पोलिसांना गुंगारा देत चोरट्यांचे घरफोडी चे सत्र सुरूच

बातमी शेयर करा :-

सूर्यकांत जोशी कुडाळ – गेल्या पाच ते सहा वर्षांपासून जावली तालुक्यात चोर पोलिसांचा खेळ चांगलाच रंगला असून पोलिसांना गुंगारा देत चोरांकडून घरफोडीचे सत्र सुरूच आहे. एवढ्या वर्षात पोलिसांना ना चोर सापडले ना कुठल्या चोरीचा छडा लागला त्यामुळे पोलिसांच्या गुन्हे अनिवेशन विभागाचे नेमके चाललंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच कुडाळ विभागातील सोनगाव व सावंतवाडी येथील सात ते आठ घरांना चोरांनी लक्ष केलं होतं. तर मंगळवारी चोरट्यांनी बाजारपेठेचे गाव असणाऱ्या कुडाळ येथील दाट लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणची तीन बंद घरे बिनधास्त फोडली. विशेष म्हणजे दररोज मेढा पोलिसांची रात्रगस्त गाडी फिरत असते त्याचबरोबर कुडाळ येथे गुरखा सुद्धा गस्त घालत असतो. असे असून सुद्धा चोरटे पोलीस व गुरख्याला गुंगारा देऊन आपले काम यशस्वीरित्या पार पाडत आहेत.

यापूर्वी सावंतवाडी व सोनगाव येथे झालेल्या घरकोडीमध्ये चोरट्यांच्या हाताला फारसा मुद्देमाल लागलेला नाही. कुडाळ येथे फोडलेल्या घरातून सुमारे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. वाराकडे अळी येथील राजेंद्र वारागडे यांच्या घरातील लहान बाळाचे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. कुडाळच्या शिक्षक कॉलनी मधील योगेश शिंदे यांचे ही बंद घर चोरट्याने फोडले परंतु शिंदे बंधू परगावी स्थायिक झाल्यामुळे या घरात काहीही किमती वस्तू नसल्याने चोरट्यांच्या हाताला काहीही लागले नाही. परंतु घरफोडी झाल्यामुळे संबंधित घरमालकांना कुठे असेल तेथून घरी यावे लागते यासाठी होणारा मनस्ताप मात्र सहन करावा लागतो. दरम्यान चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले होते. चोरट्यानी कोणताही पुरावा मागे न सोडल्यामुळे श्वान पथकाकडून कोणताही तपास होऊ शकला नाही. काही ठिकाणी चोरट्यांच्या बोटाचे ठसे आढळले आहेत. दरम्यान चोरटे चोरी करून जात असताना ही बाब काही स्थानिक रहिवाशांच्या ध्यानात आली. परंतु चोरट्याने त्यांना लगोरीचा धाक दाखवून गप्प करून पोबारा केला अशी माहिती कुडाळ पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगटे यांनी दिली. घटनास्थळांना मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी नागरिकांनी सुद्धा जागृत रहावे असे आवाहन केले.

कुडाळ मधील बंद सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्याची जबाबदारी कोणाची?

जावली तालुक्यातील कुडाळ हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तत्कालीन सरपंच , ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी व ग्रामस्थ यांनी गावच्या सुरक्षिततेच्या हिताच्या दृष्टीने सहकार्याची भूमिका घेत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पोलिसांना आर्थिक सहकार्य केले. कोरोनाच्या आणीबाणीच्या काळात या सीसीटीव्ही यंत्रणेचा पोलिसांना नियंत्रण ठेवण्यासाठी चांगलाच फायदा झाला. परंतु त्यानंतर दुरुस्ती देखभाल या भावी ही सीसीटीव्ही यंत्रणा धुळखात पडली आहे. आता ही सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची ग्रामस्थांची की पोलिसांची असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!