शासनाच्या महाराजस्व अभियानामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा – सौरभ शिंदे

कुडाळ येथील अभियानात 839 दाखल्यांचे वितरण

सूर्यकांत जोशी कुडाळ – महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून शासन आपल्या दारापर्यंत पोहोचत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे दाखले उपलब्ध होत असल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाऊन होणारी ससेहोलपट थांबत आहे. या अभियानात सर्वसामान्य जनतेचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी महसूल विभागाने मोठया प्रमाणात प्रसिद्धी देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सातारा जावलीचे लोकप्रतिनिधी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावली तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयाच्या वतीने कुडाळ ता. जावली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानात एकूण 839 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये कृषी विभाग 19, मतदार नोंदणी 10, पुरवठा विभाग 25, सेतू विभाग 42,रहिवासी दाखले 292,जातीचे दाखले 156,उत्पन्न दाखले 165,सातबारा व आठ अ 226 वितरित करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी तसेच येऊ घातलेले निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असणारे कुणबी व जातीचे दाखले स्थानिक पातळीवर मिळण्याची व्यवस्था व्हावी अशी मागणी माजी सभापती तानाजी शिर्के यांनी केली.
कार्यक्रमाला कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम महसूल अधिकारी प्रशांत कदम, पंकज शिंदे,दिपेकर पाटील,मंडल अधिकारी आर बी कोळी,ग्राम महसूल अधिकारी डी ई प्रभाळे, अमोल कुंभार,राहुल दळवी उपस्थित होते. दत्तात्रय तरडे सर यांनी सूत्र संचालन केले.