सर्वसामान्य जनतेच्या जीवनात क्रांती घडवण्याचे काम शाळा व शिक्षकांनी केले.-ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले *बेलावडे येथील प्राथमिक शाळेचा शतक महोत्सवी कार्यक्रम संपन्न*महू हातगेघर धरणाच्या कॅनॉलचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची नामदार शिवेंद्रसिंह राजेंची ग्वाही


सूर्यकांत जोशी कुडाळ – एकेकाळी अज्ञान व आर्थिक दारिद्र्यामुळे सर्वसामान्य जनतेला अतोनात हाल सोसावे लागले होते. परंतु काळाच्या ओघात होत गेलेल्या शैक्षणिक क्रांतीमुळे सर्वसामान्य जनतेच्या जीवनाला ज्ञानाच्या ज्योतीने उजाळा देण्यात शाळा व शिक्षकांचे अविस्मरणीय योगदान आहे. असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. महू व हातगेघर धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता मार्गी लागला असून लवकरच कुडाळ विभागाला वरदान ठरणाऱ्या कुडाळी प्रकल्पाच्या कॅनॉल ची कामे पूर्ण होऊन या धरणाचे पाणी लवकरच शेतात येणार अशी ग्वाही यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
जावली तालुक्यातील बेलावडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त आयोजित कार्यक्रमात ना. शिवेंद्रसिंह राजे बोलत होते. या कार्यक्रमाला 1008 श्री देवपुरी महाराज धुंदी बाबा यांचे उत्तराधिकारी हेमंत पुरी महाराज, माझी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, विजय शेलार, माण पंचायत समितीच्या माजी सभापती अपर्णा भोसले,सुनील वाघ,प्रवीण पटेल, उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी या शाळेत शैक्षणिक योगदान दिलेल्या आजी-माजी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आपण ज्या शाळेत शिक्षण घेत लहानाचे मोठे झालो त्या शाळेच्या शाळेच्या प्रांगणात आल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतात. आज आपण जी प्रगती केली आहे आपण जे आहोत व जिथे आहोत त्यामध्ये आपण शिक्षण घेतलेल्या शाळांचा बहुमोल वाटा आहे. गावच्या मालकीच्या असणाऱ्या शाळांच्या इमारतीच्या थकीत भाड्या बाबत पाठपुरावा करण्यात येईल. तालुक्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही.गाव पातळीवर असणारे मतभेद वेळीच मिटवावेत. जावली तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा व माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रतापगड कारखाना सुरु झाला आहे. या कारखान्याच्या माध्यमातूनही या विभागाच्या विकासाला चालना मिळेल.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले,बेलावडे गावाला शैक्षणिक परंपरा आहे.येथील भावी पिढी घडवण्यात शिक्षकांचे मोठे योगदान आहे. सहकार क्षेत्रात सुद्धा बेलावडे गावाचे योगदान. या गावाला धुंदीबाबांच्या माध्यमातून अदभूत शक्ती लाभली. एके काळी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्न प्रसिद्ध होता. परंतु येथील शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने जावलीपॅटर्न महाराष्ट्रात उदयास आला.विधान परिषदेत शिक्षकांचे अनेक प्रश्न असतात. या शासनाने शिक्षकांचे पगार वेळेत करावेत अशी कोपरखळी यावेळी शशिकांत शिंदे यांनी मारली. शासनाने पट संख्ये अभावी शाळा बंद करण्याचे धोरण आणले परंतु विरोधक म्हणून हा प्रयत्न आम्ही हाणून पडला. पटसंख्या अभावी शाळा बंद केल्यास डोंगरदऱ्यातील विद्यार्थी पुन्हा शिक्षणापासून वंचित राहतील म्हणून डोंगरी विभागाला वेगळे निकष लावण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषद शाळा टिकावंण्याचे मोठे आव्हान असून वेगवेगळे उपक्रम राबवून शहरी शाळांशी स्पर्धा करावी असे आव्हान आ.शशिकांत शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी बेलावडे ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न केले.