संथ गतीच्या प्रशासकीय कारभारामुळे जावलीतील जनता त्रस्त :नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लक्ष देण्याची मागणी :स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकाच्या हाती असल्याने सर्वसामान्य जनतेची होतेय अडचण.

सूर्यकांत जोशी कुडाळ :
जावली तालुक्यातील प्रशासनाच्या सुस्तावलेल्या ऐरावताला गतिमान करण्याची आवश्यकता
सूर्यकांत जोशी कुडाळ : जावली तालुक्यातील प्रशासकीय कारभार अत्यंत संथ गतीने सुरू असून या सुस्तावलेल्या प्रशासनाच्या ऐरावताला नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गतिमान करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून होत आहे. जावली तालुक्यात सध्या मांडवली व भांडवली कारभार सुरू असल्याचे चित्र असून राजकीय वरद हस्त व पैसा असेल तर काम होते अन्यथा सर्वसामान्य जनता हेलपाटे मारून त्रस्त होत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर महसूल विभागाची जबाबदारी नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपवण्यात आली. ना. बावनकुळे यांनी महसूल विभागातील कारभार गतिमान करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या. यामध्येच शासनाने शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना याबाबतच्या सूचना केल्या परंतु जावली तालुक्यात प्रशासकीय कारभार अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे. जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांचे कार्यपद्धती जरी विश्वासार्ह असली तरी सुद्धा खालील अधिकारी व कर्मचारी यांचे कडून कामाचा निपटारा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबरोबरच बऱ्याचदा सर्वसामान्य जनतेची पैशासाठी अडवणूक येत आहे. असा अनुभव सर्वसामान्य जनतेला येत आहे.
गेल्या पाच वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ न शकल्यामुळे सध्या अधिकारी राज सुरू असून जनतेचे हाल होताना दिसून येत आहे. ज्याला राजकीय वरदहस्त आहे किंवा ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे काम मात्र जलद गतीने होत आहे सर्वसामान्य जनता मात्र शासकीय कार्यालयाचे महिनोन महिने उंबरे झिजवावे लागत आहेत.. याबाबत नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी विशेष लक्ष घालावे अशी मागणी जावली तालुक्यातील जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.
जावली तालुक्यात सर्व काही ऑल इज वेल असल्याचे चित्र अधिकारी वर्ग ना. शिवेंद्रसिंह राजे यांच्यापुढे निर्माण करत आहे परंतु सर्वसामान्य जनता मात्र या अनागोंदी कारभाराने त्रस्त आहे. वरिष्ठ
कार्यकर्त्यांनी चमकोगिरी करण्यापेक्षा जनतेच्या अडीअडचणी सोडवाव्यात.
वास्तविक नामदार बाबाराजेंच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे परंतु कार्यकर्ते केवळ बाबाराजे आल्यानंतर त्यांच्याभोवती गर्दी करून आपणच किती निष्ठावान आहोत आणि आपणच किती ताकदवान आहोत हे दाखवण्यातच धन्यता मानत आहेत.ना. बाबाराजेंच्या पुढे चमकोगिरी करण्यापेक्षा सर्वसामान्य माणूस प्रत्येक कामासाठी प्रत्येक वेळी नामदार बाबाराजेंचे पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. नामदार बाबाराजेंचे वर मंत्रीपदाचे एवढी मोठी जबाबदारी असलेने स्थानिक कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेचे छोटे मोठे कामे करणे अपेक्षित आहे. असे मत जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
तहसीलदार कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मंडळाधिकारी, तलाठी, यासह अंतर्गत विभाग इत्यादी आस्थापनात सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट होत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत . या व्यतिरिक्त भूमी अभिलेख,कृषी विभाग,पंचायत समिती हे सुद्धा शासनाचे विभाग अशा गलथान कारभाराला अपवाद नाहीत. विविध प्रकारच्या नोंदी साठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
जावली तालुक्यात कृषी विभागातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काम गेल्या वर्षभरापासून ठप्प असल्याची समजते. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून दिलेले प्रस्ताव या कार्यालयात अजूनही धुळखात पडलेले आहेत. पात्र असूनही शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अथवा मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
भूमी अभिलेख कार्यालयात सुद्धा वारस नोंदी सह इतर कामकाजासाठी सर्वसामान्य जनतेला वेळ व भाडे खर्च करून सदर कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून गतवर्षी ड्रोन द्वारे अनेक गावांचे गावठानातील सर्वेक्षण करण्यात आले व त्यानुसार सिटीसर्वेचे नकाशे तयार करण्यात आले याबाबत ग्रामस्थांना कोणतेही पूर्व सूचना न देता व खातरजमा न करता हाजीर तो वजीर या न्यायाने सदर नकाशावर चुकीच्या पद्धतीने मालकी हक्काच्या नोंदी केल्या आहेत यामुळे अनेक वाद उत्पन्न झाले असून सर्वसामान्य जनतेला आपल्याच कब्जे वहिवाटीत असणाऱ्या वाडवडिलार्जित स्थावर मिळकतीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी न्यायालयाचे उंबरे झिजवण्याची वेळ आली आहे.
जावली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये काही ग्रामसेवकांनी चुकीच्या नोंदी करून विनाकारण सर्वसामान्य जनतेला कोर्ट कचऱ्या करणे भाग पाडले आहे. याबरोबरच नियमितच्या विवाह नोंदी घराच्या नोंदी यासाठी सुद्धा नाहक विलंब लावला जात आहे.
मेढा एसटी आगाराने सुद्धा अनेक बस फेऱ्या कमी केल्यामुळे ऐन लग्नसराईत प्रवाशांचे हाल होत आहेत. कुडाळ विभागातून काटवली ते मेढा ही एकमेव लांब पल्ल्याची एसटी बस असून ही बस नव्याने दाखल झालेल्या एसटी बस मधून देण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत महत्त्वपूर्ण कामगिरी करुन सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये भूसंपादन विभागाकडील ना हकरत दाखले प्रणाली, तुकडा शेरा कमी करणे, गाव नकाशेवरील अतिक्रमीत रस्ते खुले करणे, विशेष मोहिमेद्वारे वारस नोंदी, एकुमॅ नोंदी कमी करणे, लक्ष्मी मुक्ती योजना अशा महत्वपूर्ण योजनांचा समावेश आहे, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे परंतु काही कर्मचारी व अधिकारी यांच्या कृतघ्नपणामुळे या चांगल्या उपक्रमाला गालबोट लागत आहे.
प्रत्येक गटात दरमहा जनता दरबार घ्यावा -रवींद्र परामणे.
सर्वसामान्य जनतेची संबंधित अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांची ओळख असतेच असे नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटात दर महिन्याला जनता दरबार भरवुन सर्वसामान्य जनतेचे असणारे कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात आम्ही माजी पदाधिकारी आठवड्यातून एक दिवस मेढा येथे थांबून जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र परामणे यांनी दिली आहे. विविध कामांसाठी आवश्यक कागदोपत्री पूर्तता केल्यानंतर पुन्हा पुन्हा हेलपाटे मारावे लागण्याची गरजच नाही. सदर कामासाठी लागणारा वेळ संबंधितास त्याचवेळी सांगावा किंवा संबंधिताचा मोबाईल नंबर घेऊन त्याला त्याच्या कामाबाबतचे माहिती दिल्यास हेलपाटा होणार नाही एवढी जबाबदारी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्यास लोकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. जे काम स्थानिक लेव्हलच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होणार आहे त्या कामासाठी नामदार शिवेंद्रसिंह राजेंचा वेळ घेणे योग्य नाही. ज्या कामात काही अडचणी आहेत किंवा ते महाराज साहेबांच्या शिफारशी शिवाय होऊ शकणार नाही अशी कामे महाराज साहेबांच्या पर्यंत पोहोचवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे .
जावलीत सध्या मांडवली व भांडवली कारभार – संदीप पवार*
जावली तालुक्यातील कारभार सध्या प्रशासकांच्या ताब्यात असून अनेक कार्यालयात मांडवली व भांडवली कारभार सुरू आहे. सर्वसामान्य जनतेची अडवणूक करून त्याच्याकडून पैसे वसूल करून मांडवली झाल्यास काम होत आहे. जावली तालुका दुय्यम निबंधक कार्यालयात अनेक प्रकरणात सुरुवातीला दस्त होत नसल्याचे सांगून जनतेची अडवणूक केली जाते परंतु नंतर मांडवली झाल्यास सदरचे दस्त होतात असे चित्र त्या ठिकाणी दिसून येते. जावली तालुक्यातील तलाठी सजात दिवसा कमी पण रात्री जास्त दिसून येतात. रात्री होणारी वाळूची चोरटी वाहतूक त्याचबरोबर कोठे खोदकाम अथवा बोअर काढण्याचे काम सुरू असेल तर अशा ठिकाणी ही यंत्रणा अगदी आपला सजा नसला तरी सुद्धा रात्री अपरात्री सुद्धा कार्यरत असते योग्य ती मांडवली झाल्यास प्रकरण जागेवर मिटवले जाते. जावली तहसीलदारांचा प्रशासनावरती तितकासा वचक नसल्याची प्रतिक्रिया सातारा जिल्हा शिवसेना उपप्रमुख संदीप पवार यांनी व्यक्त केली आहे.