कुडाळचे पिंपळबन ‘सातारा भूषण’ पुरस्काराने सन्मानित : रोटरी क्लब ऑफ सातारा सेव्हन हिल्स संस्थेच्या माध्यमातून उपक्रमाचा गौरव


कुडाळचे पिंपळबन ‘सातारा भूषण’ पुरस्काराने सन्मानित: रोटरी क्लब ऑफ सातारा सेव्हन हिल्स संस्थेच्या माध्यमातून उपक्रमाचा गौरव
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावळी तालुक्यातील कुडाळ येथील पडीक असणाऱ्या जागेत लोकसहभागातून साकारलेल्या पिंपळबन उपक्रमाला रोटरी क्लब सातारा सेव्हन हिल्स या संस्थेच्या वतीने ‘सातारा भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. भावी पिढ्यांना वरदान ठरणाऱ्या या जीवनावश्यक निसर्ग संवर्धक उपक्रमाचा रोटरी क्लब ऑफ सातारा सेवन हिल्स या संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरव केला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ रोटरी अमरसिंह पाटणकर, रो. डॉ. राहुल फासे, रो. राजीव रावळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.रोटरी क्लब ऑफ सातारा सेव्हन हिल्स संस्थेचे अध्यक्ष रो अमित बेंद्रे यांनी रोटरी क्लब च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रोटरी क्लबचे सचिव हरीश भोसले व डॉक्टर विक्रांत देशमुख यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्काराबाबत माहिती दिली. पिंपळबन उद्यानाच्या माध्यमातून कुडाळ गावची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जीव ओतून काम करणाऱ्या पिंपळबनचे संवर्धक दिवंगत मनोज आप्पा वंजारी यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना मरणोत्तर सातारा भूषण पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार त्यांच्या पत्नी श्रीमती मनीषा मनोज वंजारी यांना रोटरी सातारा भूषण अवॉर्ड 2025’ देऊन सन्मानित करण्यात आले.त्याच बरोबर पिंपळबनचे संस्थापक व संवर्धक महेश पवार व विद्यमान सर्व सक्रिय सदस्यांना ” सातारा भूषण ” अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री पिंपळेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भाऊराव शेवते, संघटक भिकू राक्षे गुरुजी, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, विद्यमान उपसरपंच सोमनाथ कदम, सदस्य राहुल ननावरे, पत्रकार सूर्यकांत जोशी, महेश बारटक्के, कराटे असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश गोंधळी उपस्थित होते . रोटरी क्लब ऑफ सातारा सेव्हन हिल्स संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात साहित्यिक ,शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कार्य करणाऱ्या व्यक्तींना इन्स्पिरेशन ऑफ रोटरी, सातारा भूषण,व्यावसायिक सेवा, जिगीषा व नेशन बिल्डर अशा विविध पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. कुडाळच्या पिंपळबन समितीच्या माध्यमातून निसर्गाचा हा अनमोल ठेवा जतन करण्याचे व वाढवण्याचे होत असलेले कार्य प्रेरणादायी आहे. असे प्रशंसोद्गार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अमरसिंह पाटणकर यांनी काढले. पिंपळबनचे सदस्य अविनाश गोंधळी यांनी यावेळी पिंपळबन या उपक्रमाची माहिती उपस्थिताना दिली. आजवर पिंपळबनच्या वाटचालीत सर्व ग्रामस्थ, हितचिंतक, निसर्गप्रेमी तसेच सर्व पिंपळबन टीम यांचे मौलिक सहकार्य लाभत आहे. आपल्या सांघिक प्रयत्नामुळेच ‘आपल पिंपळबन’ हा प्रकल्प आज दिशादर्शक ठरत आहे. यापुढील काळातही सर्वांनी असेच सहकार्य करावे असे आवाहन महेश पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता बेंद्रे यांनी केले.फोटो – रोटरी क्लब सातारा सेव्हन हिल्स संस्थेच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार स्वीकारताना पिंपळबन चे सदस्य ( सूर्यकांत जोशी कुडाळ )

