कुडाळ हायस्कूल मध्ये २००९-१० बॅचचा स्नेहमेळावा खेळीमेळीत संपन्न. ‘विद्यार्थी व शिक्षकांकडून जुन्या आठवणींना उजाळा ‘


कुडाळ हायस्कूल मध्ये २००९-१० बॅचचा स्नेहमेळावा खेळीमेळीत संपन्न. विद्यार्थी व शिक्षकांकडून जुन्या आठवणींना उजाळा सूर्यकांत जोशी कुडाळ -जावली तालुक्यातील महाराजा शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे दहावीच्या 2009 -10 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी व शिक्षक यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. पंधरा वर्षानंतर पुन्हा भेटलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये तसेच मित्र आणि मैत्रिणींमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद देत माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तब्बल पंधरा वर्षानंतर भेटलेल्या मित्र मैत्रिणींनी आपापल्या पूर्व आठवणींना उजाळा देत एकमेकांसोबत मनसोक्त चर्चा करत कार्यक्रमाचा आनंद लुटाला. या सर्वांची भेट घडवून आणण्यासाठी मयुरी बोडरे , आकाश शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सर्वांनी मेळाव्यास उपस्थित राहून आनंद घेतला.
यावेळी आपल्या आदरणीय गुरुजनांवर विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. प्रारंभी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक परमपूज्य बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून सरस्वती मातेस वंदन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती विद्यार्थ्यांचे हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत शाळे प्रती असणाऱ्या आठवणी किस्से सांगत आपले मनोगत व्यक्त केले.
आजची युवा पिढी केवळ भौतिक साधन संपन्नतेच्या मागे लागली आहे केवळ स्वतः ची भौतिक प्रगती झाली म्हणजे आपण जीवनात यशस्वी झालो असा समज करून घेऊ नये. या पिढीने जीवनातील मूल्ये जाणून वात्सल्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणे आवश्यक आहे. आज आपण प्रगतीची एक एक पायरी चढत असताना जीवनाच्या पहिल्या पायरीपासून आई-वडील शिक्षक, मित्र, नातेवाईक, हितचिंतक अशा समाजातील वेगवेगळ्या घटकांनी केलेले सहकार्य आणि दिलेले मौलिक मार्गदर्शन याचेही भान ठेवणे आवश्यक आहे.असा मौलिक संदेश यावेळी ज्येष्ठ शिक्षक एटने सर यांनी दिला. रसाळ सर यांनी शैक्षणिक सेवा काळातील विद्यार्थ्यांप्रती असणाऱ्या स्नेहरुपी नात्याच्या आठवणींचे मजेदार किस्से सांगितले. पानसकर ए ए,कांबळे यू एम,पाटील एस ए,जाधव बी. बी,घुले एन,पाटील ए.जी,निकम एस.बी. ,कणसे पी. एस. यांनी शिक्षणानंतर व्यवहारिक जीवनातील आवाहने आणि वाटचाली बाबत मार्गदर्शन केले.
कराटे प्रशिक्षक अविनाश गोंधळी यांनी शिक्षकांवर तयार केलेल्या कवितांच्या माध्यमातून आपल्या शाळेतील आठवणींचा उलगडा करत सूत्रसंचलन केले.
माजी विद्यार्थ्यांनी शाळेस दिला स्मार्ट टीव्ही
आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शाळेच्या शैक्षणिक साहित्यास उपयुक्त, शैक्षणिक स्तर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शाळेस 43 इंच साइजचा सॅमसंग कंपनीचा एलईडी टीव्ही भेट स्वरूपात दिला. कार्यक्रमाची आठवण म्हणून शाळेच्या प्रांगणात 14 झाडे लावून वृक्षारोपनही केले. सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटत पुढच्या वर्षी पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्धार केला..