विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने दोन म्हशींचा मृत्यू शेतकऱ्याचे लाखोंच्या नुकसान महावितरणच्या भोंगळ कारभार: पशुवैद्यकीय अधिकारीही संपर्क क्षेत्राच्या बाहेर


सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ येथे आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संतोष बळवंत बुधावले या शेतकऱ्याच्या म्हैस व रेडकाला शेतात जात असताना विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत संबंधित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.
कुडाळ परिसरात शेतामध्ये अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत आहेत या वीज वाहक तारांचा ताण काढण्यात यावा व सुरक्षित अशा उंचीवर ठेवण्यात याव्यात अशी शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कार्यालयालाकडे सूचना केली आहे.कुडाळ येथील नवीन बंधाऱ्यापासून जुन्या आर्डे पानंदरस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत लोंबकळत असणाऱ्या विद्युत वाहिन्यांबाबत च्या तक्रारी शेतकऱ्यांनी महावितरणकडे वारंवार दिल्या असल्याचे माहिती यावेळी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. परंतु अजूनही सोनगाव व कुडाळ महावितरण कार्यालयाकडून या लोंबकळत असणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा ताण काढण्यात आलेला नाही. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे आज एका गरीब शेतकरी संतोष बुधावले यांच्या म्हैस व रेडकाचा विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे.त्यामुळे या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची पुढील पूर्तता होण्याच्या दृष्टीने संबंधित शेतकऱ्याने कुडाळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा कॉल नॉट रिचेबल येत होता. त्यानंतर पशुवैद्यकीय दवाखाना मेढा यांच्याशी संपर्क साधला असता तेथील अधिकाऱ्यांकडून कुडाळ येथेच आपल्याला तक्रार नोंदवावी लागेल असे सांगितल्याचे शेतकरी संतोष बुधावले यांनी सांगितले . या या घटनेचा अमृतसर पंचनामा व म्हशींच्या सेवा विच्छादन होण्यासाठी शेतकऱ्याची अक्षरशः दिवसभर ससेहोलपट झाली. अखेर उशिराने संबंधित अधिकारी उपस्थित राहून पुढील सोपस्कार पार पाडले गेले. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या म्हैंसीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मला प्रशासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संतोष बळवंत बुधावले यांनी केली आहे.
या घटनेनंतर तरी कुडाळ व सोनगाव महावितरण कार्यालयाकडून शेतीमधून लोंबकळत जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा ताण काढण्यात यावा.अन्यथा मुक्या जनावरां सोबतच भविष्यात मनुष्य जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे महावितरणाने तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.