जावलीत कोरोना बाधितांचा आकडा ४०६/१५

जावलीत आज २० जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह
एकूण ४०६ , बळी १५ , डिस्चार्ज ३२३, अँक्टिव्ह ६८
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील दुदुस्करवाडीत आता कोरोनाची मोठी साखळी तयार झाली असून आज या गावातील तब्बल १७ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. या गावातील कोरोना बाधितांचा आकडा आता ३६ वर पोहचला आहे. तसेच अँन्टीजेन टेस्ट मध्ये दापवडी येथील तीन जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. दापवडी येथील कोरोना बाधितांचा आकडा १६ वर पोहचला आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.
दरम्यान भूतेघर येथील मुंबई हुन थेट सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान म्रुत्यू झाल्याने जावलीतील कोरोना बाधितांचा आकडा पंधरावर पोहचला आहे.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली.
जावली तालुक्यात गेल्या दोन महिन्यात रामवाडीत कोरोना बाधितांचा आकडा ३२ वर पोहचला होता ही साखळी तोडण्यात प्रशासनाने यश मिळवले असतानाच पुनवडीला १६२ जण कोरोना बाधित झाल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान ठाकले होतें. परंतु तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, सपोनि निळकंठ राठोड या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने पुनवडीची साखळी तोडण्यात यश मिळवले. पुनवडीतील दोघांचा बळी गेला मात्र अन्य सर्वजण कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत.
त्या पाठोपाठ लगेचच आता दुदुस्करवाडीत साखळी तयार झाल्याने गेल्या दोन महिन्यात जावलीतील प्रशासन आणि आरोग्य विभागाला उसंत मिळाली नसल्याचे दिसून येते. लोकांनी भावनांना आवर घालून कार्यक्रम घेणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे.
जावलीतील खर्शीबारामुरे ला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील खर्शीबारामुरे येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार खर्शीबारामुरे या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.