जावलीत आज १ बाधित ९ डिस्चार्ज ;अखेर कुडाळ मध्येही कोरोनाचा शिरकांव

जावली तालुक्यात अखेर कुडाळ मध्येही कोरोनाचा शिरकांव
आज १ बाधित ९ डिस्चार्ज
एकूण ४३८ , बळी १५ , डिस्चार्ज ३४०, अँक्टिव्ह ८३
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असलेल्या कुडाळ मध्ये अखेर आज कोरोनाचा शिरकाव झाला आहे.येथील ७५ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. सदर व्यक्तीला आठ दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु आजाराची लक्षणे पाहुन डाँक्टरांच्या सल्याने कोरोना चाचणी घेण्यात आली असता सदर व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल आला आहे. दरम्यान शनिवारी दुदुस्करवाडी सह अन्य ठिकाणच्या पाठवलेल्या स्वाबचे अहवाल अद्याप पर्यंत प्राप्त झाले नाहीत.
दरम्यान तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते ,वैद्यकीय अधिकारी वेलकर यांनी कुडाळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी सदर व्यक्ती रहात असलेल्या परिसराची पाहणी करुन पुढील प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या.तसेच कुडाळ मधील पवार आळीला मायक्रो कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लावण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
सदर व्यक्तीच्या हायरिस्क मधील आठ तर लो रिस्क मधील सतरा जणांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले आहे.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ.भगवान मोहिते यांनी दिली.दरम्यान कोरोना बाधित व्यक्ती कुठुन बाधित झाली याची चौकशी करण्यात येत आहे. आज ९ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याचे डाँ. मोहिते यांनी सांगितले.
दरम्यान कुडाळच्या सर्व नागरिकांनी आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य करावे तसेच योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी केले आहे.कुडाळ मधील व्यक्तीचा कोरोना पाँझिटीव्ह अहवाल आल्याचे समजताच खबरदारीचा उपाय म्हणून कुडाळ बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली. तर सोमवारी सुद्धा बाजारपेठ बंद राहणार आहे. त्यानंतर पुढील परिस्थिती पाहुन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच विरेंद्र शिंदे यांनी दिली आहे.कुडाळ ग्रामस्थांचा सतर्कते मुळे गेल्या चार महिन्यात गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. यापुढील काळात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.
कुडाळ गावातील पवार आळीला मायक्रो कन्टेमेंटचे तर खर्शी तर्फ कुडाळला कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील कुडाळ व खर्शी तर्फ कुडाळ येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार कुडाळ या गावातील पवार आळीला मायक्रो कन्टेमेंट झोन चे तर खर्शी तर्फ कुडाळला कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.