कोरोनाच्या महामारीत डाँक्टरच बनलेत देवदूत ;

कोरोनाच्या महामारीत डाँक्टरच बनलेत देवदूत ; लोकांनी नियमांचे पालन करणे हाच उपाय.
सूर्यकांत जोशी कुडाळ – संपूर्ण जगाला ग्रासणार्या कोरोना महामारीने दिवसेंदिवस रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. कोविड १९ या आजारावर कोणतेही हमखास औषध उपलब्ध नाही. परंतू स्वतः चा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांना धीर देऊन उपचार करणारे डॉक्टर या रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत.या कालावधीत सर्वच डाँक्टरांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने शासनाची आरोग्य यंत्रणा अपूरी पडत आहे. सलग पाच महिने कोरोनाचा पाठलाग करणाऱ्या आरोग्य यंत्रणेचीही दमछाक होत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर शासनाच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.शासनाचा आदेश असला तरीही या डाँक्टरांनी दाखवलेला सेवाभाव सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.
लोकांनी कोरोनाला गांभीर्याने घ्यावे डॉ. लाहोटी.
आज कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रुग्णावर उपचार करणे हे डॉक्टरांपुढे मोठे आव्हान आहे. लोकांनी कोरोनाचा धोका गांभीर्याने घेतला तर कोरोनाला थोपवणे शक्य होणार असल्याचे मत सातारचे प्रसिद्ध सर्जन डॉ. जीवन लाहोटी यांनी व्यक्त केले.
कोरोनाचे संकटात सर्जन पासून ग्रामीण भागातील जनरल फिजिशियन पर्यंत सर्वचजण शासनाला सहकार्य करत आहेत. कोरोना रुग्णापुढे जाताना शत्रुसैन्याशी लढण्यासाठी निघाल्याचाच आभास होत असतो.तर घरी आल्यावर कुटुंबाचीही तितकीच काळजी वाटते. लोक हितासाठी धोका पत्करुन डॉक्टर सेवा देत आहेत. यामध्ये योग्य खबरदारी घेऊन ही अनेकदा डाँक्टरांसह अनेक आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित होत आहेत. कोरोनाशी मुकाबला करताना आज पर्यंत अनेक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलीस , प्रशासकीय कर्मचारी प्राणास मुकले आहेत. याच भान लोकांनी ठेवले पाहिजे .सोशल डिस्टेन्सींग,मास्क व सँनिटायझर चा वापर करुन कोरोना पासून प्रत्येकाने स्वसंरक्षण केले पाहिजे.असेही डॉ. लाहोटी म्हणाले.
डॉक्टरांनी रुग्ण तपासताना काळजी घ्यावी – डॉ.आठल्ये
दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासन आदेशानुसार खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना केअर सेंटरवर सेवा देण्यासाठी बोलवले जात आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यावर अपवादात्मक परिस्थितीत डाँक्टराना सुद्धा संसर्ग होत आहे. खाजगी डाँक्टरांना कोविड सेंटरवर सेवा बजावल्या नंतर त्यांच्या रेग्युलर रुग्णांची सेवाही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डाँक्टरांनी योग्य ती काळजी घेऊन रुग्ण तपासणी करणे आवश्यक आहे. जेणे करुन एकमेकांपासून कोणालाही संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.अशी सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केली आहे.
कोविड केअर सेंटरवर सात दिवस सेवा बजावणार्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना सह आरोग्य तपासणी करुनच घरी पाठवले जाते .कोविड सेंटरवर सेवा बजावणार्या डाँक्टरांना आवश्यक सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत.अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांनी दिली आहे.