रेशनिंग दुकानात निक्रष्ठ दर्जाच्या धान्याचे वितरण

रेशनिंग दुकानात निक्रष्ठ दर्जाच्या धान्याचे वितरण
जनतेच्या गरीबीची क्रूर चेष्ठा
सूर्यकांत जोशी कुडाळ – सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून दगड आणि माती मिश्रीत काळाकुट्ट तांदुळ व दर्जाहीन गहू वितरण करून शासनाच्या वतीने गरीबांच्या गरीबीची क्रूर चेष्ठा केली जात आहे.
.कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत गरीबांना आधार देण्यासाठी शासनाने गरीबांना मोफत व सवलतीच्या दरात धान्य वाटप करण्याचा चांगला निर्णय घेतला. यामुळे लाँकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला. परंतू शासकीय गोदामात येणारे धान्य अनेक वेळा निक्रष्ठ दर्जाचे येत आहे. आणि पुढे तेच धान्य वितरीत केले जात आहे.किमान निवडून पाखडुन खाण्यासारखे धान्य असलेतर कोणाची तक्रार नसते कारण आजवर या लाभार्थींच्या ते अंगवळणीच पडले आहे.
कुडाळ येथील स्वस्त धान्य दुकानात काळ्याकुट्ट तांदुळात चक्क दगड आणि माती आढळली.तर गहू सुद्धा दर्जाहीन असल्याचे निदर्शनास आले.याबाबत संबंधित वितरकाकडे विचारणा केली असता धान्याची पोती भरताना संबंधित हमालांनी खाली सांडलेले तांदूळ पोत्यात खाली भरले असावेत त्यामुळे असा प्रकार घडू शकतो असे सांगितले व संबंधित लाभार्थीला खराब तांदूळ बदलून दिले.याच दरम्यान कुडाळचे गोदाम निरिक्षक तिथे उपस्थित होते. त्यांनी असा खराब माल आल्यास परत करावा असे दूकानदारास सूचना केली.
खराब धान्याचे वितरण करु नये – तहसीलदार
दरम्यान असा प्रकार अनेक ठिकाणी घडण्याची शक्यता असल्याने व त्यामुळे गरीबांच्या अन्नात खडे आणि माती कालवली जाण्याची शक्यता असल्याने ही बाब तात्काळ जावलीचे तहसीलदार शरद पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याबाबत तहसीलदार यांनी अशाप्रकारे धान्याची एखादी गोणी खराब असल्यास त्याचे वितरण करु नये .लाभार्थ्यांना चांगल्या धान्याचे वितरण करावे अशी सूचना स्वस्तधान्य दुकानदाराना केली आहे.