कुडाळ आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी संशयितरित्या घिरट्या घालणाऱ्याला जेरबंद करा.-डॉ.वेलकर

कुडाळ – प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रात्रीच्या वेळी अज्ञात इसम संशयितरित्या घिरट्या घालत आहेत. सदर विकृत व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर यांनी पोलिसांकडे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही संशयित या परिसरात फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. परंतु सदर इसम पळून जाण्यात यशस्वी होत आहेत. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास डॉ वेलकर यांना या परिसरात संशयित व्यक्ती दिसली. परंतु आपली चाहूल लागताच सदर व्यक्ती पळून गेल्याचे डॉ. वेलकर यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात बऱ्याच वेळी रात्रीचे वेळी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व परिचारिका यांना निवास स्थानातून आरोग्य केंद्रात यावे लागते. परंतु अशा संशयित व विकृत व्यक्तींपासून काही धोका होण्याची शक्यता व भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करणे आवश्यक असून रात्रीच्या वेळी याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमवा अशी मागणी आरोग्य केंद्राचे कर्मचारी व रुग्णांनी केली आहे.