सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का….

खरीपाच्या पेरण्या अंतीम टप्यात. शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे
कुडाळ – जावली तालुक्यातील खरीप हंगामातील पेरण्या आता उरकल्या आहेत.परंतु गेल्या आठ दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारली असल्याने शेतकरी वर्ग आता पावसाची वाट पहात आभाळाकडे पाहू लागला आहे.
यावर्षी खरीप भुईमूग लावण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे. त्याच बरोबर सोयाबीन, काळा घेवडा, चवळी, मूग,पावटा यासह अन्य कड धान्यांची पेरणी करण्यात येत आहे. डोंगराळ भागात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भाताची रोपे तयार असून लागणी साठी अजुन पाऊस होणे आवश्यक आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पेरण्यांना सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला पेरणी केलेले बियाणे आता उगवुन आली आहेत. परंतु ही कोवळी पीके उन्हाचा तडाखा फार दिवस सहन करु शकणार नाहीत. आगामी चार ते पाच दिवसांत पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती तालुक्यातील प्रसिद्ध शेतकरी मित्र सतीश परामणे यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना मुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत महागाई ची खते व बियाणे मातीत घातली आहेत. परंतु पावसाने पाठ फिरवली असून आषाढ महिन्यात सूर्य आग ओकू लागला आहे. दुबार पेरणीचे संकट आल्यास बियाणांच्या तुटवड्याबरोबरच शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट ओढावणार आहे.लवकरात लवकर पाऊस पडावा अशी देवाकडे प्रार्थना शेतकरी वर्ग करत आहे.