आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विजय निश्चितच : गावातील मतांची आघाडी ठरणार कार्यकर्त्यांची अग्नी परीक्षा


सूर्यकांत जोशी कुडाळ – विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान झाले आहे.सातारा जावली मतदारसंघातून महायुतीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा विजय निश्चित मानला जात आहे. परंतु कोणत्या गावातून किती लीड मिळणार यावर कार्यकर्त्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल एक कार्यकर्त्यांची अग्नी परीक्षा ठरणार आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे ऐनवेळी सातारा जावली मतदारसंघाची जागा (उबाठा) शिवसेनेला सोडण्यात आली. आपले संपूर्ण हयात शिवसेनेत एक निष्ठेने घालवणारे अनेक कार्यकर्ते सातारा जावलीत असताना राष्ट्रवादी काँग्रेस मधून ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या अमित कदम यांना उमेदवारी दिली गेल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. तरीसुद्धा माजी आमदार सदाशिव सपकाळ, ज्येष्ठ नेते एस एस पार्टे यांनी पक्षादेश म्हणून अमित कदम यांना साथ दिली. ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेने अमित कदम यांनाही लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गेली पंधरा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. केलेली विकास कामे, जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वास, सक्षम कार्यकर्त्यांची फळी, सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारणावर असलेली मजबूत पकड यामुळे संपूर्ण विधानसभा मतदारसंघावर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे प्रभुत्व दिसून येते. अशा परिस्थितीत अमित कदम यांना किती मते मिळतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना गावागावातील गटबाजी मोडीत काढून सर्वांना एकसंध ठेवण्यात या निवडणुकीत यश आल्याचे दिसून आले. गाव पातळीवरचे राजकारण बाजूला ठेवून गावात असणारे सर्व गट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासाठी काम करत होते. परंतु ही एकसंधता या पुढील काळात टिकून राहीलच याबाबतची साशंकता व्यक्त केली जात आहे.
कुडाळ जिल्हा परिषद गटात प्रतापगड सहकारी साखर कारखाना गटाचे सुरुवातीपासून प्राबल्य आहे. या गटात माजी आमदार लालसिंगराव शिंदे व कारखान्याचे माजी चेअरमन राजेंद्र शिंदे यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत या गटावर सुरुवातीपासूनच कारखाना गटाचे वर्चस्व राहिले आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात या गटावर माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. त्याचबरोबर माजी सभापती सुहास गिरी व जयश्री गिरी यांच्याशी कारखाना गटाचे फारसे सख्य नव्हते. परिणामी गतनिवडणुकीत कारखाना गटाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. याची सल प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या मनात नक्कीच असणार आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सौरभ शिंदे व त्यांचे कार्यकर्ते कुडाळ जिल्हा परिषद गटात मध्ये पायाला भिंगरी लावून बाबाराजेंचा प्रचार करत होते. निवडणूक विधानसभेची असली तरी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले गेले.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे झालेल्या जाहीर सभेत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी आपले जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा आहे. या सभेसाठी प्रचंड मोठी गर्दी जमवण्यात सौरभ शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे. माजी सभापती सुहास गिरी यांच्यासह या गटातील अनेक मातब्बर कार्यकर्त्यांची हजेरी होती. ही एकजूट यापुढेही राहिल्यास सौरभ शिंदे यांना कुडाळ गट जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक गावातील प्रमुख नेत्याचे गावातील राजकीय वजन या निवडणुकीच्या निमित्ताने समजणार आहे. आपल्या गावातून महाराजांना जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत. विधानसभा निवडणुकीतील गावागावातून मिळणाऱ्या मताधिक्यावर तसेच गट आणि गन पातळीवर कार्य करणाऱ्या नेतृत्वाला त्याचे राजकीय भवितव्य ठरवणारे ही निवडणूक आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने नेतृत्वाला सुद्धा कार्यकर्त्याचे त्याच्या गावातील बळ कळणार आहे. त्यामुळे केवळ गेली पंधरा वर्षे महाराजांच्या मागे पुढे राहणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या गावातून महाराजांना किती मतदान मिळते याबाबतची उत्सुकता लागली आहे.