Skip to content

कुडाळ जिल्हा परिषद गटात विरोधकांचा सुपडासाफ :आमदार शिवेंद्रसिंहराजेंना विरोधकांची एकजुट मोडीत काढण्यात यश

बातमी शेयर करा :-

: कुडाळ जिल्हा परिषद गट वार्तापत्र सूर्यकांत जोशी कुडाळ – विधानसभेच्या निवडणुकीत सातारा जावली मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दृष्टीपथात आल्या असून कुडाळ जिल्हा परिषद गटात जोरदार रस्सीखेच आहे. कुडाळ जिल्हा परिषद गटाचा सेनापती कोण ठरणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीत कुडाळ जिल्हा परिषद गटात माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने गेल्या काही वर्षांपासून असणारी विरोधकांच्या एकजुटीला तिलांजली मिळाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत भाजपाच्या माध्यमातून बांधण्यात आलेली वज्रमूठ कायम ठेवण्याच्या आव्हान प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्याकडे असणार आहे. कुडाळ गटात विरोधी पक्षाची स्थिती मजबूत नसल्याने भाजपा अंतर्गतच कार्यकर्त्यांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ राहणार आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कुडाळ गटातून 11971 इतके मताधिक्य मिळाले. कुडाळ गटातून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळावे यासाठी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी, राजेंद्र शिंदे, मालोजीराव शिंदे, विरेंद्र शिंदे,मच्छिंद्र मुळीक, दादा फरांदे पाटील, प्रवीण देशमाने यांच्यासह प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच यांच्यासह प्रमुखांनी प्रयत्न केलेला आहे. कुडाळ गटात सत्ताधारी पक्षाच्या तसेच प्रतापगड कारखाना गटाला रोखण्यासाठी नेहमी त्यांचे विरोधक एकवटत होते. परंतु या निवडणुकीत प्रमुख राजकीय विरोध असलेल्या दीपक पवार व त्यांचे बंधू सुधीर पवार यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. त्यामुळे यापुढील काळात विरोधकांची एकी होईल का याबाबत शंका आहे. अशा परिस्थितीत विरोधकातील दुफळीचा फायदा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपला होणार आहे.

या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये केलेले विकास कामे तसेच जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वास यामुळे घवघवीत यश मिळाले आहे. शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजना, शेतकऱ्याची वीज बील माफी या सारख्या योजनांचा सुद्धा फायदा झालेला आहे.

कुडाळ गटाचे नेतृत्व आज पर्यंत माजी आमदार लालसिंगराव शिंदे, कारखान्याचे माजी चेअरमन राजेंद्र शिंदे यांच्या माध्यमातून प्रतापगड कारखाना गटाकडे राहिले होते. त्यानंतर या गटावर दीपक पवार यांचा प्रभाव राहिला. कुडाळ जिल्हा परिषद गटात सौरभ शिंदे यांना रोखण्यासाठी विरोधक एकवटले होते. आताची परिस्थिती पाहता विरोधकांमध्ये समन्वय असल्याचे दिसून येत नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दीपक पवार यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे काम केले. तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी व जयश्री गिरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

गेल्या वर्षीपासून प्रतापगड कारखाना सुरू झाल्यामुळे कुडाळ गटातील ऊस उत्पादक, सभासद व कारखान्याचे कर्मचारी यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.याचा फायदा नक्कीच सौरभ शिंदे यांना होणार आहे . कुडाळ गटातल्या राजकारणाची एक बाजू आहे.कुडाळ गटातील राजकारणाची दुसरी बाजू पाहता भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा इच्छुकांची यादी मोठी आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती साठी पडणारे आरक्षण हा सुद्धा यातील महत्त्वाचा भाग राहणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण राहिल्यास भाजपा अंतर्गतच रस्सीखेच वाढण्याची शक्यता आहे. कुडाळ जिल्हापरिषद गटात आपले वर्चस्व राखण्यासाठी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे व जावली तालुका शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी यांचे मध्ये चढाओढ असताना दिसते. परंतु हे तिन्ही नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शब्द पाळणारे असल्यामुळे त्यांना एकमेकाशी तडजोड करूनच राहावे लागणार आहे.

कुडाळ जिल्हा परिषद गट यापूर्वी खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे यावेळी रोटेशन प्रमाणे कदाचित ओबीसी पुरुष आरक्षण पडण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. या गटातून सध्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शोभाताई बारटक्के यांचा मुलगा महेश बारटक्के, माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते शामराव किर्वे यांचे चिरंजीव अनिल किर्वे , प्रतापगड कारखान्याचे संचालक दादा फरांदे पाटील, प्रवीण देशमाने,राजेश (लालासो )वंजारी,राहुल ननावरे, आशिष रासकर हे प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.माजी सभापती सुहास गिरी हे सुद्धा ओबीसी प्रवर्गातून आपला दावा करू शकणार आहेत. कुडाळ जिल्हा परिषद गटात सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे एकतर्फी वर्चस्व आहे. येणाऱ्या काळात दीपक पवार काय भूमिका घेतात. तसेच माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अमित कदम, शिवसेनेचे एस एस पार्टे गुरुजी विरोधकांना संघटित करण्यात कितपत यशस्वी होतात हे पहावें लागणार आहे.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कुडाळ जिल्हा परिषद गटातील विकास कामांच्या बाबत सुद्धा विशेष लक्ष घालावे लागणार आहे. जनतेला अपेक्षित असणारी विकास कामे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर मार्गी लावणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुडाळ जिल्हा परिषद गटातील रखडलेली विकास कामे 1) पुनर्वसित पानस ते कुडाळ रस्ता दर्जेदार होणे आवश्यक आहे .2) गेल्या 30 वर्षापासून रखडलेला क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे.3) महू हातगेघर धरणाची कालव्याची कामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.4) कुडाळ विभागातील प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक कोल्हापूर सांगली पुणे मुंबई कडे जाणाऱ्या एसटी बसेस सुरू करणे.5) नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला पाचवड ते रत्नागिरी कोकणाला जोडणारा रस्ता जलद गतीने होण्याबरोबरच हे काम दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणे.6) कुडाळ मेढ्यासारख्या शहरीकरण झालेल्या गावांना कचरा निर्मूलनाची व्यवस्था भेडसावत असलेले घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करणे. यासह विविध विकासात्मक कामांच्या बाबत सुद्धा विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.7) स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी छोटे मोठे औद्योगिक व कृषी औद्योगिक प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे.8)पांचगणी येथील टेबल लँड प्रमाणे मेरूलींग येथील बंडा पठार तसेच वैराटगड विकसित करून पर्यटनाला चालना देण्यासाठी उपाय योजना करावी.

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!