आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मंत्री पदासाठी कार्यकर्त्यांचा देवाकडे धावा

सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांच्या प्रतिभेला साजेशे मंत्रीपद मिळावे यासाठी गावोगावचे कार्यकर्ते देवाला पूजाअर्चा, अभिषेक व नवस बोलून साकडे घालत आहेत. यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असणाऱ्या देवाच्या पूजा अर्चनाना सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज प्रसिद्धी मिळत आहे.
गेल्या पंचवीस वर्षांमध्ये आमदार शिवेंद्रसिंह राजांची सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. केवळ मतदार संघाच्या नव्हे तर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक राजकीय व सामाजिक उपक्रमांना आमदार बाबाराजेंनी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या निवडणुकीत त्यांना मिळालेले मताधिक्य हे त्यांनी केलेल्या कामाचे जनतेने दिलेली पोहचपावती आहे. गेले पंचवीस वर्षे विधानसभेचे सदस्य म्हणून कारकीर्द गाजवली असल्याने त्यांना मंत्रीपदाची संधी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांसह आम जनतेला वाटने हे स्वाभाविकच आहे. निवडणूक निकालानंतर गेल्या आठ दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या यादीत सर्वच प्रसिद्धी माध्यमानी आमदार शिवेंद्रसिंह राजे यांना मंत्रीपदाची संधी मिळेल असे आपल्या वार्तांकनात नमूद केलेले आहे. एकूणच आमदार शिवेंद्रराजे यांचे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असणारे सलोख्याचे संबंध व या निवडणुकीत मिळालेले विक्रमी मताधिक्य या मुळे त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान नक्कीच मिळू शकणार आहे.
आमदार शिवेंद्र राजेंना मंत्री पद मिळावे यासाठी जावली तालुक्याचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे व कावडी ग्रामस्थांनी आपल्या ग्रामदैवताला अभिषेक केला. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर यांना अभिषेक करून महाआरती करण्यात आली. आखाडे येथील विक्रम शिंदे यांनीही त्यांच्या ग्रामदैवताला भैरवनाथाला अभिषेक केला. माजी सभापती अरुणा शिर्के व त्यांचे पती अजय शिर्के यांनी म्हसव्याच्या जननी मातेला साकडे घातले. माजी उपसभापती रवींद्र परामणे,संदीप परामने,संतोष शेलार यांनी सोमर्डी च्या भवानी मातेला प्रार्थना केली. सरपंच पर्यंत परिषदेचे अध्यक्ष समाधान पोफळे यांनी प्रति पंढरपूर येथील विठ्ठल रुक्माई ला अभिषेक केला. तसेच मच्छिंद्र मुळीक यांनी खर्शी तर्फ कुडाळची कुलदेवता राम वरदायिनी देवीला नवस केला आहे.
अशाप्रकारे तालुक्यातील विविध गावांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रिपद मिळावे यासाठी देवाला साकडे घातले जात आहे.