Skip to content

” म्हसवे गटात आमदार शिवेंद्रराजेंचेच तोरण अन् मानकुमरे भाऊ म्हणतील ते धोरण” : आमदार शशिकांत शिंदे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार

बातमी शेयर करा :-

म्हसवे जिल्हा परिषद गट वार्तापत्र

सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील म्हसवे गटातून आमदार बाबाराजे यांना सन्मानजनक मताधिक्य मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या म्हसवे गटात आमदार शशिकांत शिंदे यांचे व जावली तालुक्याचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांचे गाव येते. या गटात आमदार शिवेंद्रराजे यांचे तोरण बांधले जाणार असून मानकुमरे भाऊ म्हणतील ते धोरण अशीच परिस्थिती आहे . तरीसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत मध्ये आमदार शशिकांत शिंदे यांना म्हसवे गटातून सुमारे साडेतीन हजारांचे मताधिक्य मिळाले असल्यामुळे या गटातील विरोधी ताकद सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही.

जिल्हा परिषदेच्या म्हसवे गटातील बहुतांश गावे दुर्गम व डोंगराळ आहेत. परंतु येथील लोकांनी परिस्थितीवर मात करत सचोटीने कष्ट करून आपली प्रगती साधली . या गटातील म्हसवे गणातील बहुतांश गावे बागायती शेतीची आहेत. हातगेघर गणातील अपवाद वगळता सर्वच गावे डोंगरी विभागात येतात . पावसावर आधारित डोंगर उताऱ्यावरील शेती असल्याने या विभागातील लोकांना रोजीरोटी साठी मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरावर अवलंबून राहावे लागते. असलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मागील पिढीतील लोकांनी मुंबापुरीत मध्ये मिळतील ते कष्टाची कामे व व्यवसाय करून आपली प्रगती साधली आहे. त्यांच्या या प्रामाणिक कष्टाचे चीज होऊन या गणात मध्ये अनेक छोटे मोठे उद्योगपती व उच्चपदस्थ अधिकारी झाले आहेत. एकेकाळी अज्ञान आणि आर्थिक दारिद्र्यात असणारा हा विभाग शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला आहे. त्यामुळे या गटांमध्ये निवडणूक म्हटलं की जो जास्त खर्च करणार त्याची उमेदवारी पक्की असा गेल्या काही वर्षातील अनुभव आहे.

या गटात मध्ये आमदार शशिकांत शिंदे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, पंचायत समितीचे माजी सभापती मोहनराव शिंदे, अरुणा शिर्के,माजी उपसभापती रवींद्र परामणे,हणमंतराव पार्टे, दत्तात्रय गावडे, सयाजीराव शिंदे, प्रकाशराव भोसले, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे अशा अनेक मातब्बर मान्यवरांच्या गावांचा समावेश आहे. यापूर्वीच्या निवडणुकात या गटात मध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचा गट भक्कम होता. परंतु आमदार शशिकांत शिंदे जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या फारसे संपर्कात राहत नसल्याने अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले गेले. तालुक्यातील अगदी मोजकेच कार्यकर्ते आज आ.शशिकांत शिंदे यांच्यासोबत आहेत. त्याचबरोबर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी गेल्या पंधरा वर्षांमध्ये गावोगावच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांशी जवळीक साधून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात मध्ये आपुलकीचे स्थान निर्माण केले.

आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जावली मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार असताना यात किंचितही जावली तालुक्याकडे लक्ष दिले नाही. तसेच आमदार शशिकांत शिंदे यांचे जावली तालुक्यातील कार्यकर्ते कोरेगाव मतदार संघात त्यांच्या प्रचारात व्यस्त राहिले. तालुक्यातील इतर गावांप्रमाणेच आमदार शिंदे यांच्या हुमगाव, कोलेवाडी, जरेवाडी या गावामध्ये अमित कदम यांना 315 तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना तब्बल 924 इतके मतदान झाले आहे. म्हसवे गटात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना तब्बल दहा हजार 624 इतके मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे म्हसवे गटात मध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांच्या झंझावाता पुढे विरोधकांचे आव्हान कितपत निर्माण होते हे येणारे काळात पहावे लागणार आहे.

येणाऱ्या काळात आमदार शशिकांत शिंदे जावलीच्या राजकारणात लक्ष घालून सत्ताधाऱ्या विरोधात विरोधकांची मोट बांधणार की ते कोरेगाव मतदार संघात पुन्हा आपली राजकीय घडी बसवण्यासाठी पूर्ण वेळ देणार हे पहावे लागणार आहे. जावली तालुक्यात सत्ताधाऱ्या विरोधात माजी आमदार सदाशिव सपकाळ, नुकतेच शिवसेनेत गेलेले उमेदवार अमित कदम, शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एस एस पार्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार एकत्र येऊन विरोधी आघाडी तयार करण्यात यशस्वी होणार का सुद्धा आगामी काळात पाहायला लागणार आहे.

म्हसवे गटात पाठीमागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या पुरुष प्रवर्गासाठी आरक्षण होते. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी पक्षीय पातळीवर लढली गेली होती. जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी पक्षातून वसंतराव मानकुमरे व भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच्या माध्यमातून मेरी एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक यशवंत पवार यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. यशवंतराव पवार यांच्या माध्यमातून या मतदारसंघाला एक उच्चशिक्षित उमेदवार मिळाला होता. त्यामुळे या निवडणुकीत मध्ये मतदार यशवंत पवार यांना निवडून देतील असे सुरुवातीचे वातावरण होते. परंतु राजकीय डावपेचात तरबेज असलेल्या वसंतराव मानकुमरे यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. तसेच गत निवडणुकीत हातगेघर पंचायत समिती गणातून दत्ता गावडे व म्हसवे पंचायत गणातून अरुणा शिर्के हे आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या तगडे उमेदवार राष्ट्रवादीला मिळाले होते. खासदार श्री. छ.उदयनराजे भोसले यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर खर्शी बारामुरे येथे दगडफेक झाल्याने गत निवडणूक राज्यात गाजली होती.

वसंतराव मानकुमरे यांना राज्य पातळीवर संधी मिळावी :

गेले पंचवीस वर्ष शिवसेना,राष्ट्रवादी आणि भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याच्या तसेच जावलीच्या राजकारणात मध्ये आपले वर्चस्व गाजवणाऱ्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांना राज्यस्तरावर काम करण्यासाठी मानाचे स्थान मिळावे अशी अपेक्षा वसंतराव मानकुंमरे व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कडून व्यक्त केली जात आहे. या पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणार नाही असे स्पष्ट संकेत मानकुमरे यांनी दैनिक ऐक्य प्रतिनिधीशी बोलताना दिले आहेत.

आगामी निवडणुकीत स्थानिकांना संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा

निवडणूक म्हटलं तर पैसा लागतोच, मग हयात भर प्रामाणिक काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय केव्हा मिळणार असा सवाल या गटातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे . मुंबईत राहणाऱ्या पैसेवाल्यांना संधी देण्यापेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांना या निवडणुकीत संधी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांच्या कडून व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकीत मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून म्हसवे गटात खुल्या प्रवर्गातून पंचायत समितीचे माजी उपसभापती हणमंतराव पार्टे यांच्या सारख्या जुन्या जाणत्या नेतृत्वाला संधी मिळणार की नवोदितांना संधी दिली जाते हे आगामी काळात समजणार आहे.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू कार्यकर्ते संदीप परामणे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. या जिल्हा परिषद गटातून पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता गावडे,सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पोफळे, युवा कार्यकर्ते विक्रम शिंदे,विकास धोंडे, अजय शिर्के, प्रकाश परामणे यांच्यासह अनेक ताकदीचे कार्यकर्ते इच्छुक आहेत.शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार यांनीही जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बुवासाहेब पिसाळ तर राष्ट्रीय काँग्रेस कडून अशोकराव परामने, विक्रम तरडे सध्या इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरीसुद्धा या निवडणुकीसाठी अजून काही काळ जाणार असल्यामुळे कार्यकर्ते योग्य संधीची वाट पाहत आहेत.

म्हसवे गट गेल्यावेळी खुल्या प्रवर्गातील पुरुष आरक्षित होता. त्यामुळे या निवडणुकीत म्हसवे गटात खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण पडण्याची दाट शक्यता आहे. या गटात पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के यांनी आपल्या कारकिर्दीत कर्तृत्व व वक्तृत्व दोन्हीमध्ये नेतृत्व सिद्ध केले आहे. त्याचबरोबर गत निवडणुकीत भारतीय जनता पक्षामार्फत निवडणूक लढलेले मेरी एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक यशवंत पवार यांच्या पत्नी क्रांती पवार या सुद्धा शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी विचार केला जाऊ शकतो.

म्हसवे गटातील अपेक्षित विकास कामे

म्हसवे जिल्हा परिषद गट दुर्गम डोंगराळ असला तरी निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या गटात येणाऱ्या वैराटगड, महू व हातगेघर धरणाचा जलाशय गर्द हिरवेगार डोंगर, लगतच असणाऱ्या थंड हवेचे ठिकाण पाचगणी यामुळे या गटात पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या गटाचा विकास साधताना पर्यटनाच्या दृष्टीने एक लक्ष दिले पाहिजे. जावली तालुक्यातील गावांचा होऊ घातलेल्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पात जास्तीत जास्त समावेश केला जावा अशी अपेक्षा सयाजीराव शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय पर्यटनाला चालना देण्यासाठी पाचगणी पायथ्याशीच असणाऱ्या महू धरणात बोट क्लब सुरू करून पाचगणी कडे येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित केले जाऊ शकते.महू व हातगेघर धरणाच्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण केल्यास प्रतापगड सहकारी साखर कारखान्यासाठी आवश्यक उसाचे क्षेत्र उपलब्ध होऊ शकणार आहे उर्वरित कॅनॉलचे काम तातडीने पूर्ण व्हावे. येणाऱ्या काळात या विभागातील उसाचे क्षेत्र वाढणार असल्यामुळे या गटातील पानंदरस्ते विकसित करण्याचा प्रयत्न व्हावा. शेतीमालाला नजीकची बाजारपेठ उपलब्ध व्हावी हुमगाव ते बावधन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. अशी अपेक्षा या गटातील सर्व सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे

बातमी शेयर करा :-
[the_ad id="4264"]
error: Content is protected !!