हुमगाव बावधन रस्त्याचे काम प्राधान्याने करणार – नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले


सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील करहर व हुमगाव परिसरातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्याला वाई बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या हुमगाव ते बावधन रस्त्याचे काम प्रथम प्राधान्याने करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
जावली व वाई तालुक्याला जोडणारा हुमगाव ते बावधन रस्ता तातडीने व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली म्हसवे जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच आणि बाकी कार्यकर्त्यांनी ठराव आणि निवेदन दिले.यावेळी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, संदीप परामने, समाधान पोफळे,पांडुरंग तरडे, बाळासाहेब निकम, भाऊसाहेब जंगम, नितीन बापू, प्रकाश भोसले,संतोष मामुलकर,सखाराम गायकवाड, विकास धोंडे ,कुलदीप नलावडे, जीवन भोसले, संदीप निकम, विक्रम शिंदे, अजय पाडळे, निलेश पवार, योगिता शिंदे, ललिता जगताप, विविध गावचे सरपंच यावेळी उपस्थित होते.
यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हुमगाव बावधन या रस्त्यासाठी प्रशासकीय पातळीवर कामाला सुरुवात झाली आहे असे सांगितले. मंत्रिपदाच्या कारकीर्दीतील जावली तालुक्यात पहिले काम माझ्या अजेंडावर हुमगाव बावधन हे काम असेल असे ठाम आश्वासन ना. शिवेंद्रराजे यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या म्हसवे गटातील सोमर्डी, हुमगाव, करहर पंचक्रोशील शेतकऱ्यांना शेतीमाल खरेदी विक्रीच्या दृष्टीने वाई बाजारपेठेचे संपर्क साधण्यासाठी जवळच्या ठरणारा हुमगाव ते बावधन रस्ता हवा अशी मागणी गेल्या 40 ते 50 वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे. परंतु या दरम्यान वनविभागाच्या हद्दीतून रस्ता जात असल्याने हे काम अद्याप रखडले आहे. यासाठी गेल्या दोन वर्षापासून हुमगाव ते बावधन रस्ता कृती समितीची स्थापना करून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत कृती समितीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. त्याला यश येऊन सदर रस्त्याच्या सर्वेसाठी निधी उपलब्ध झाला होता. तरीसुद्धा वनविभागाच्या हद्दीतून रस्ता काढण्यासाठी आवश्यक कागदोपत्री पूर्तता होणे यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री पद नुकतेच नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मिळाल्याने या रस्त्यातील तांत्रिक अडचणी दूर होऊन या रस्त्याचे काम लवकर पूर्ण होईल म्हणून सर्वसामान्य जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.