कुडाळ येथील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत सुरू करावी :

सूर्यकांत जोशी कुडाळ – समाजात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत असून विविध प्रकारच्या गुन्ह्यांसोबतच शालेय मुली व महिला यांच्यावरील अत्याचाराच्या घटना देशभरात तसे राज्यात अनेक ठिकाणी घडत आहेत.गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांना शोधण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरत आहे. जावली तालुक्यातील कुडाळ येथे पाच वर्षांपूर्वी लोकसहभागातून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. व या यंत्रणेचे नियंत्रण कुडाळ पोलीस दुरक्षेत्रातून केले जात होते. परंतु तत्कालीन स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका बसल्याने येथील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली आहे. सदरची यंत्रणापूर्ववत सुरू करावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली परंतु त्यावर अद्याप कोणतेही ठोस कार्यवाही झाली नाही. ही यंत्रणा पूर्ववत सुरू करण्यासाठी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पोलीस यंत्रणा पहात आहे काय असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत दिली. अपेक्षेप्रमाणे गावात सुमारे बाराशे सीसीटीव्ही कॅमेरा ची नजर लक्ष ठेवून होती. काही दिवस ही यंत्रणा सुरळीत सुरू होती. बाजारपेठेतील वाहतुकी वरती पोलीस दुरुक्षेत्रात बसून ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून पोलीस नियंत्रण करत होते. परंतु अल्पावधीतच हे यंत्रणा बंद पडली. याबाबत अधिक चौकशी केली असता सीसीटीव्ही बसवणाऱ्या ठेकेदाराला त्याची पूर्ण रक्कम न मिळालेने ही यंत्रणा बंद पडली असल्याचे चर्चेतून दिसून आले. ग्रामस्थांनी आवश्यक रक्कम पोलिसांच्याकडे सुपूर्त केले असताना ही रक्कम संबंधित ठेकेदाराला का मिळाली नाही असा सवाल उपस्थित होत आहे.
गावच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्यासाठी गावातील लोकप्रतिनिधी व पोलीस यंत्रणेने प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे