प्रतापगड कारखाना लवकरच जिल्ह्यात अग्रेसर होईल ना. शिवेंद्रसिंह राजे :अजिंक्य तारा प्रतापगड कारखाना गळीत हंगामाची सांगता


सूर्यकांत जोशी कुडाळ- पुढील गळीत हंगामात उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने पाच लाख मे. टन हुन अधिक उसगाळापाचे उद्दिष्ठ ठेऊन सर्वांनी तयारीला लागावे.प्रतापगड कारखाना नव्या जोमाने उभा रहात आहे. सर्वांनी जिद्दीने काम केल्यास लवकरच प्रतापगड सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात अग्रेसर होईल असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्य तारा प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या सन 2024-25 च्या गळीत हंगाम सांगता समारंभ व साखर पोती पूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रत ना. भोसले बोलत होते.प्रारंभी संचालक ताराबाई पोफळे व ज्ञानेश्वर पोफळे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रतापगड कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती सुनेत्रा शिंदे, अजिंक्य तारा कारखाना चेअरमन यशवंत साळुंखे,व्हा चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, प्रतापगड कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे, अजिंक्य तारा व प्रतापगड कारखान्याचे सर्व संचालक तसेच माजी सभापती मोहनराव शिंदे, माजी उपसभापती रवींद्र परामणे, हणमांतराव पार्टे, तानाजी शिर्के, नेताजी सुभाष चंद्र बोस वाचनालयाचे संस्थापक संदीप परामने आदी मान्यवर उपस्थित होते.
ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले,दोन वर्षांपूर्वी पाऊस कमी झाल्याचा फटका ऊस उत्पादनाला बसला त्यामुळे यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असताना व दरांची स्पर्धा असताना अजिंक्यतारा प्रतापगड उद्योग समूहाचा हा गळीत हंगाम यशस्वी झाला . प्रसंगी तोटा सहन करून उसाचा शेतकऱ्यांना तीन हजार रुपये दर दिला. प्रतापगड कारखान्याला अन्य उपपदार्थांचे उत्पादन नसल्याने सुरुवातीच्या काळात जास्त दर देणे परवडणारे नाही. तरी सुद्धा स्पर्धेत राहण्याचा प्रयत्न केला. पुढील वर्षी मोठया प्रमाणात उसाचे उत्पादन होणार आहे. पुढील गळीत हंगामात पाच लाख मे. टन ऊस गाळापाचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आले. प्रतापगड चा बसलेला आर्थिक हत्ती उठवायचा असेल तर पुढील गळीत हंगामासाठी सर्वांनी सहकार्य करावे. गेले दोन हंगाम यशस्वी झाले नसले तरीही आठ कोटी कर्ज फेड केली. कारखाना लवकरात लवकर कर्ज मुक्त करण्यासाठी दोन्ही संचालक मंडळ प्रयत्नशील आहोत. दोन वर्षात जिल्हा बँकेचे एकोणीस कोटी रुपये कर्ज फेडले. इतर कारखान्या सोबत प्रतापगड ची तुलना सध्या तरी कोणी तुलना करू नये. शेतकऱ्यांना ऊस बील लवकरात देण्याचा प्रयत्न आहे. तसेच कामगारांना सुद्धा वेळेत पगार देण्याचा प्रयत्न आहे. यावर्षी प्रमाणेच पुढील वर्षी सर्वांनी सहकार्य करावे. असे आव्हान नामदार भोसले यांनी केले.यावेळी ना. भोसले यांनी शेतकरी, अधिकारी वर्ग,कामगार, ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा,यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे म्हणाले,पावसा अभावी उसाचे क्षेत्र कमी असून सुद्धा दोनलाख अकरा हजार साखर पोती उत्पादन झाले. ना. शिवेंद्रसिंह राजेंचे प्रयत्न आणि शेतकरी सभासद यांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वी झाला. इतर कारखान्याच्या तुलनेत दर योग्य दिला.याची जाणीव शेतकऱ्यांनी ठेऊन पुढील गळीत हंगामाला ऊस देऊन सहकार्य करावे. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन एडवोकेट शिवाजीराव मर्ढेकर यांनी आभार मानले.