
सूर्यकांत जोशी कुडाळ – वाई आणि जावली तालुक्यातील प्रवाशांना पुणे बंगलोर महामार्गावरील जंग्शन स्टेशन म्हणून पाचवड बस स्थानकाची ओळख आहे. या स्थानकात दोन्ही तालुक्यातील हजारो प्रवाशांना यावे लागते. परंतु पुणे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना तसेच सातारा, सांगली कोल्हापूर कडे जाणाऱ्या प्रवाशांना असुरक्षित पणे रस्त्यावर थांबून बसची वाट पहावी लागते.त्यामुळे याठिकाणी नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात.त्याच बरोबर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारा लगत साठलेली पाण्याची डबकी आणि दुर्गंधी साथ रोगाना निमंत्रण देणारी ठरत आहे.
महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे अर्थात एसटी चे प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद आहे. ही लाल परी म्हणजे सर्वसामान्य जनतेला प्रवासासाठी हक्काचा सोबती वाटते. परंतु जावली आणि वाई तालुक्यातून लांब पल्याचा प्रवास करताना पाचवड याठिकाणी आल्या नंतर आपण कोणत्या चुकीची शिक्षा भोगतोय याचा पश्चाताप होतो.
जावली तालुक्यातून पाचगणी पायथ्यापासून कुडाळ परिसरातून दररोज शेकडो प्रवाशांना पुणे मुंबई सांगली कोल्हापूर यासारख्या शहराकडे जायचे असते. परंतु या विभागातून पुणे मुंबई कोल्हापूर सांगली या ठिकाणी जाणारी एकही बस उपलब्ध नाही. या प्रवाशांना पाचवड येथे बससाठी यावे लागते. या ठिकाणी या ठिकाणी येणाऱ्या बसेस लांबून येत असल्यामुळे अगोदरच प्रवाशांनी खचाखच भरलेले असतात. या विभागातील प्रवाशांना उभा राहून गर्दीत प्रवास करण्याची नामुष्की येते. त्यातच बऱ्याचदा बस मध्ये जागा नसल्याने या ठिकाणी बसेस थांबत नाहीत. प्रवाशांना तासनतास थांबावे लागते. त्यातच या बसेस बस स्थानकात न येता बाहेर सर्विस रोडवर थांबवले जातात. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर थांबावे लागते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची डबकी साठली असून विविध साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची निर्मिती या ठिकाणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतीच गावोगाव भेटी देऊन साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे नागरिक व अधिकाऱ्यांना उपदेशाचे डोस दिले. परंतु अशा सार्वजनिक ठिकाणी साथ रोगांचा फैलाव करणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन नायनाट करण्याची जबाबदारी कोणाची हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडत आहे.
काही वर्षांपूर्वी मेढा आगारातून कुडाळ मार्गे पुणे,मुंबई,सांगली व कोल्हापूर कडे जाणाऱ्या बस सोडण्यात येत होत्या. या बसच्या माध्यमातून एसटीला चांगले उत्पन्न मिळत होते. परंतु मध्यंतरीच्या काळात कोणा अधिकाऱ्याने या विभागातील जनतेला पाचवड ला आल्यानंतर बस मिळतील असा जावई शोध लावला. परंतु त्याने लांबच्या प्रवासाला जाताना या प्रवाशांचे असणारे प्रवासी सामान, लहान मुले यांच्या सहप्रवास करताना महिला व बालवृद्धांना काय यातना होतील याचा थोडाही विचार केला नाही. या विभागातील लोकप्रतिनिधी तसेच आर्थिक दृष्टया सक्षम असणाऱ्या लोकांजवळ स्वतःच्या आलिशान गाड्या असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेचे दुःख कधीच समजले नाही त्यामुळे त्यांनी आजपर्यंत या विभागातून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू व्हाव्यात यासाठी फारसा प्रयत्न केला नाही अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून उमटत आहे हे या विभागातील सर्वसामान्य जनतेचे दुर्दैवच आहे.या बंद केलेल्या बस पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत.
या विभागातील अनेक विद्यार्थी तसेच नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्या प्रवाशावर दररोजच पश्चाताप करण्याची वेळ येते. सकाळी सात ते दहा या वेळेत तर या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. तीन तीन तास थांबून या ठिकाणी बस मिळत नाही.त्यामुळे जीव धोक्यात घालून बऱ्याचदा खाजगी वाहनाने लांबचा प्रवास करण्याची वेळ येते. तर अनेकदा वेळेवर बस न मिळाल्याने नोकरीचे अथवा शाळेचे नुकसान होते.त्यामुळे मेढा व महाबळेश्वर आगारातून कुडाळ मार्गे लांब पल्याच्या एस टी बस सुरु कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.