सूर्यकांत जोशी कुडाळ – सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून कुडाळ येथील विविध विकास कामांसाठी सुमारे चार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. सदर विकास कामांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला होता अशी माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली..
यामध्ये शासनाच्या एस आर ( एमडीआर पंचवीस) योजनेतून छत्रपती संभाजी नगर चौक ते बाजार पेठ मार्गे इंदिरानगर पर्यंत रस्ता रुंदीकरण डांबरीकरण व बंदिस्त गटर करण्यासाठी दोन कोटी 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला स्मार्ट पी एस सी व मुख्य इमारत दुरुस्तीसाठी 86 लाख 47 हजार रुपयांचा भरघोस निधी मिळाला आहे. याशिवाय मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे या विधीतून शिक्षक कॉलनी येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, माळी आळी येथे बंदिस्त गटार, कुडाळ एसटी स्टँड मागील रस्ता डांबरीकरण करणे तसेच चिकणेघर ते डंबे घर व पिंपळेश्वर कॉलनीतील निलेश पवार यांचे घर ते रस्त्यापर्यंत बंदिस्त घटक करण्यासाठी अशा विविध पाच कामांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा असा 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.
गावातील विकास कामे दर्जेदार व्हावीत – गोंधळी
कुडाळ गावची लोकसंख्या आणि गावचा विस्तार पाहता कुडाळची ओळख स्मार्ट सिटी होणे गरजेचे आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून गावामध्ये एवढा मोठा निधी प्राप्त झालेला आहे. ही खूप समाधानाची बाब आहे. शासनाच्या मिळालेल्या या निधीतून होणारी कामे दर्जेदार होणे अपेक्षित आहे. त्यासाठी संबंधित परिसरातील जनतेने व ग्रामस्थांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. नेत्यांनी हे विकास कामे जरूर आपल्या ठेकेदार व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करून घ्यावीत. परंतु त्याचा परिणाम विकास कामांच्या दर्जावर होणार नाही याची काळजी घ्यावी. अशी अपेक्षा कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते व क्रीडा प्रशिक्षक अविनाश गोंधळी यांनी व्यक्त केली आहे.

