जावलीत आज पाच जणांचा कोरोना पाँझिटीव्ह अहवाल;वरोशी १, सायगांव ४
सायगांव बनतय कोरोना हाँटस्पाँट
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज सायगांव येथील चार तर वरोशी येथील ल एक अशा पाच जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे.तर पुनवडी येथील प्राप्त झालेले सर्वच्या सर्व ६९ जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत . अजुन उर्वरीत अहवाल उद्या पर्यंत प्राप्त होऊ शकतील अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली. दरम्यान वरोशी येथे मुंबई हुन आलेल्या एक जणाला त्रास जाणवू लागल्याने त्याने खाजगी लँबला कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. संबंधितांवर शासकीय कोरोना केंद्रात उपचार सुरू आहेत. पुनवडी नंतर आता सायगांव येथे कोरोना रुग्नात वाढ होत आहे.सायगांव कोरोनाचा हाँटस्पाँट बनत असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
पुनवडीला जिल्हाधिकार्यांची भेट
जावली तालुक्यातील जेमतेम सातशेच्या घरात लोक संख्या असणारे गाव कोरोना साखळी मुळे जिल्ह्यासह राज्यात चर्चेत आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हयातील अनेक वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी या गावाला वेळोवेळी भेट देऊन परिस्थिती ची पाहणी करुन तालुका प्रशासनाला मार्गदर्शक सूचना करत आहेत.आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुनवडी गावाला भेट दिली. पुनवडी येथील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील,अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतिश बुद्धे, सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड,तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते मंडलाधिकारी ए. ए.मेमन ,वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे, सतीश मर्ढेकर, विशाल रेळेकर, संदीप ढाकणे, डी. एम. यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी सिंह यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. कवारे यांच्याकडून माहिती घेतली .यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्याकडून आढावा घेतला व सूचनाही केल्या.
जावलीतील वरोशी गावाला कन्टेमेंट झोनचे निर्बंध लागू ; – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील वरोशी येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरोशी या गावाला कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
रांजणीचे कन्टेमेंट झोनचे निर्बंध शिथिल
जावली तालुक्यातील रांजणी या गावांत कोरोना पाँसिटीव्ह रुग्ण आढळल्याने कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात आले होते. परंतू निर्धारित कालावधीत या गावांत अन्य कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार या गावातील कन्टेमेंट झोन चे निर्बंध शिथील करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.