सूर्यकांत जोशी कुडाळ – केवळ नियम न पाळण्याने कोरोनाचा धोका जास्त वाढत आहे. यामुळे आपण आपल्या चूकीमुळे आपल्या कुटुंबातील लोकांसह समाजाला अडचणीत आणत आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. यावर्षी सर्वच प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. जावली तालुक्यातील अन्य गणेश मंडळांनी या पद्धतीनेप्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी केले.
कुडाळ ता. जावली येथे आयोजित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सपोनि .निळकंठ राठोड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनंत वेलकर, पीएसआय संतोष चामे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शिंदे,हवालदार इम्रान मेटकरी, पराडके, सरपंच वीरेंद्र शिंदे, धनंजय केंजळे,मनोज वंजारी तसेच परिसरातील गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.
सपोनि निळकंठ राठोड म्हणाले, गणेश आगमन ,नियमित पूजा विधी व विसर्जन साठी फक्त पाचच लोकांना परवानगी आहे. तसेच गणपतीची छोटी मूर्ती आणणे, उत्सवात आरोग्य उपक्रम गर्दी न करता राबवणे.एकगाव एक गणपती योजना राबवावी. हे सर्व निर्बंध आपल्या ,आपल्या कुटुंबातील लोकांच्या व समाजाच्या हितासाठी आहेत. आणि ही सामाजिक जबाबदारी आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला ती सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करुन समाजाचे कोरोना पासून संरक्षण करणे आवश्यक आहे.
कोरोना सारख्या औषध उपलब्ध नसलेल्या आजाराला सामोरे जाणे हे प्रत्येका पुढेच फार मोठे आव्हान आहे.पोलीस व प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
पोलीस व प्रशासनाने गणेशोत्सवा बाबत मंडळांवर निर्बंध घातले नसून ती एक आदर्श आचारसंहिता आहे. या आचार संहितेचे तंतोतंत पालन गणेशोत्सव मंडळे करून प्रशासनाला सहकार्य करतील असा विश्वास गजराज मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक महेश पवार यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम सामाजिक अंतर ठेवून राबवणे याबरोबरच कोरोना बाबत समाज जागृती करणारे उपक्रम राबवले जातील. विसर्जन सुद्धा शिस्तबद्ध केले जाईल. यावर्षी आरोग्य रक्षक गणेशोत्सव साजरा केला जाणार असल्याचे नटराज युवक मंडळाचे अध्यक्ष महेश बारटक्के यांनी सांगितले.
उपस्थितांचे स्वागत सरपंच वीरेंद्र शिंदे यांनी केले. पीएसआय संतोष चामे यांनी आभार मानले.
Very Nice Joshi Mala keep it up 👍